४१ जागा लढवणाऱ्या शिवसेनेची उत्तर प्रदेशात दाणादाण



उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या मैदानात भाजपला आव्हान देत शिवसेनाही उतरली. या निवडणुकीत शिवसेनेनं राज्यात तब्बल ६० जागांवर आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली होती. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगानं पक्षाच्या १९ जणांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे केवळ ४१ जणांना प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी उत्तर प्रदेशात फिरताना दिसले. परंतु, निकालात मात्र नागरिकांनी शिवसेनेला साफ नाकारल्याचं दिसून येतंय. सकाळी १०.०० वाजेपर्यंत शिवसेनेला 'नोटा'हूनही कमी मतदान झालेलं दिसून आलं.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपविरुद्ध घमासान सुरू असतानाच शिवसेनेननं उत्तर प्रदेशात स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. मात्र, निकालांत शिवसेनेचं डिपॉझिटही जप्त होण्याची चिन्हं दिसून येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, निवडणुकीच्या निकालापूर्वी जाहीर झालेल्या अनेक 'एक्झिट पोल'मध्ये शिवसेनेचा उल्लेखही नव्हता. मात्र, निकालात एक्झिट पोल चुकीचे ठरणार, असा दावा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. ज्या राज्यांत विधानसभा निडवणुका पार पडल्या त्या राज्यांत नागरिकांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे. ईव्हीएम मशीन उघडल्यानंतर नागरिकांचा हा रोष स्पष्टपणे दिसून येईल, असंही राऊतांनी म्हटलं होतं.


शिवसेनेकडून मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. निवडणुकीदरम्यान राऊत यांनी पश्चिम यूपीतील काही जिल्ह्यांचा दौराही केला होता. १९९१ पासून शिवसेना उत्तर प्रदेशात निवडणुका लढत असल्याचा दावा करत शिवसेनेनं यूपीत स्वतंत्रपणे आपला जोर आजमावून पाहिलाय. आदित्य ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, खासदार राजन विचारे हेदेखील प्रचारसभांत सहभागी झाले होते.

शिवसेनेचे उमेदवार 'नापास'

पक्षाकडून पीलीभीतमधून भूपराम गंगवार, धौराहारातून मुनेंद्र कुमार अवस्थी, श्रीनगरमधून ज्ञानप्रकाश गौतम, हुसैनगंजमधून पवन कुमार श्रीमाली, लखनऊ सेंट्रलमधून गौरव वर्मा, लखनऊ बीकेटीमधून अरविंद कुमार मिश्रा, लखनऊ पूर्व मतदार संघातून मिथिलेश सिंग, मोहम्मदीतून प्रशांत दुबे, बिस्यानमधून प्रभाकर सिंह चौहान आणि गोसाईगंजमधून पवन कुमार यांना उमेदवारी देण्यात आलीय.


२०१९ सालचा उद्वव ठाकरेंचा अयोध्या दौरा

शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा २०१९ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेला अयोध्या दौराही चांगलाच गाजला होता. 'हिंदुत्वा'चा मुद्दा उचलून धरत यूपीतील अयोध्या, काशी आणि मथुरा यांसारख्या शहरांत शिवसेनेनं जोर लावला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या