“काश्मीरची खरी फाईल काय आहे हे…”;

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया


बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहेत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या या चित्रपटाच्या वादावर मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे, असा आरोप मोदींनी केला आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.


“द कश्मीर फाईल्स अजिबात वादात सापडलेला नाही. हा चित्रपट भाजपाच्या लोकांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदी स्वतः त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत. ३२ वर्षापूर्वीचा आक्रोश, वेदना हे सर्व दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचे कौतुक केले पाहिजे. पण त्यामध्ये अनेक सत्य दडपलेली आहेत. लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडून राजकीय अजेंडा राबवला जात आहे. काश्मीरची वेदना जेवढी शिवसेनेला माहिती असेल तेवढी इतर कोणला माहिती असेल असे मला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी काश्मिरी पंडितांच्या वेदनेवर देशात आवाज उठवला. युती सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांचे शिष्ठमंडळ बाळासाहेबांना भेटायला आले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी जाहीरपणे काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या असे सांगितले होते. त्या शिष्ठमंडळाने शिक्षणासाठी राखीव जागा मागितल्या होत्या. बाळासाहेबांनी त्यावेळी काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी महाराष्ट्रात वैद्यकीय आणि इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी पाच टक्के राखीव जागा ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे काश्मीरची खरी फाईल काय आहे हे आम्हाला माहिती आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


“हा काय राजकीय अंजेडा नाही. आम्ही काश्मिरी पंडितांसाठी करुन दाखवले आहे. कोणत्या भाजपाशासित राज्याने केले आहे का? नुस्ता सिनेमा टॅक्स फ्री करुन वेदना समोर येणार आहे. ३२ वर्षानंतर तुम्हाला हे आठवलं आहे कारण पुढच्या चार राज्यात आता निवडणुका आहेत. काश्मिरी पंडितांचा इतिहास आम्हाला माहिती आहे. काश्मिरी पंडितांसाठी आवाज उठवणारे फक्त बाळासाहेब ठाकरे होते आणि बाकी सगळे तेव्हा अतिरेक्यांच्या भीतीने गप्प होते, असेही संजय राऊत म्हणाले.


दरम्यान, काश्मीर खोऱ्यमतून १९९०मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपाच्या अजेंडय़ावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी मंगळवारी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले आहे.


महाराष्ट्रात चित्रपट करमुक्त करण्याची भाजपाकडून मागणी


‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याच्या मागणीचे विधानसभेतील ९२ आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले. राष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीचा संदेश हा चित्रपट देत असल्याने त्यास करमुक्त करावे असे या निवेदनात नमूद केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या