Breaking News

“काँग्रेस बाप आहे, बापच राहील”, नाना पटोलेंनी भाजपाला सुनावलं!


नाना पटोले म्हणतात, “काँग्रेसनंच हा देश उभा केला. ज्या काँग्रेसच्या भरवशावर ते मोठे झाले, त्याच काँग्रेसविषयी ते बोलत असतील, तर…”

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून सत्ता फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोनच पक्ष उपभोगत असून काँग्रेसला दुय्यम स्थान असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी देखील यासंदर्भात काही वेळा नाराजी बोलून दाखवली आहे. यावरून सातत्याने राज्यात भाजपाकडून काँग्रेसवर खोचक टीका केली जात असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील महाविकास आघाडीच्या संसारात काँग्रेस बिन बुलाए बाराती असल्याची टीका केली होती. नाना पटोलेंचा रोख याच टीकेच्या दिशेनं असल्याचं बोललं जात आहे.

नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा

नाना पटोले यांनी यावेळी मोदी सरकारवर निशाणा साधला. “जेव्हा मोदींचं सरकार केंद्रात आलं, तेव्हापासून न्यायव्यवस्थेमध्ये भेदभाव होतोय असं चित्र पाहायला मिळतंय. संविधानात न्यायव्यवस्थेला वेगळं स्थान आहे. सगळ्यांना समान न्याय मिळायला हवा, ही अपेक्षा न्यायव्यवस्थेकडून आहे. पण देशातली परिस्थिती पाहाता एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय हे लोकशाहीला घातक आहे. न्यायव्यवस्थेच्या विरोधात आपल्याला बोलता येत नाही. पण मला वाटतं की जनतेमध्ये न्यायव्यवस्थेबाबत संभ्रम आणि अविश्वास निर्माण होत आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेमध्ये सुधार व्हावा ही अपेक्षा आमची आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

“एसटी कर्मचारी आंदोलनाला भाजपाची फूस”

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपाला भाजपाची फूस असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. “न्यायालयानं बनवलेल्या समितीचाही रिपोर्ट आला. सरकारकडून हे शक्य नाही असं सांगितलं जातं. पण भाजपानं या आंदोलनाला फूस लावली. त्यातून प्रवाशांना, विद्यार्थ्यांना, एसटी कामगारांना त्याचा त्रास झाला. राज्यात या पद्धतीचं आंदोलन याआधी झालेलं नाही. एसटी कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत. काँग्रेस पक्ष त्या प्रश्नांसाठी भूमिका मांडेल. पण ही ती वेळ नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आवाहनाला मान्यता देऊन आंदोलन मागे घ्यावं”, असं आवाहन नाना पटोले यांनी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

“काँग्रेसनंच हा देश उभा केला”

दरम्यान, काँग्रेसवर टीका करणाऱ्या विरोधकांना नाना पटोले यांनी सुनावलं. “आम्ही त्यांना अनेकदा उदाहरणं दिली की काँग्रेस बाप आहे, बाप राहील. त्यांनी या चिल्लर गोष्टी सोडून द्या. काँग्रेस कुणाचीही बिन बुलाए मेहमान नाही. काँग्रेसनंच हा देश उभा केला. ज्या काँग्रेसच्या भरवशावर ते मोठे झाले, त्याच काँग्रेसविषयी ते बोलत असतील, तर ही त्यांची नादानी आहे”, असं नाना पटोले म्हणाले.

“महाविकास आघाडीचा संसार म्हणजे राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मूक बायको आणि काँग्रेस…”, सुजय विखे पाटलांचा खोचक शब्दांत निशाणा!

सुजय विखे पाटील म्हणतात, “महाविकास आघाडीचा संसार म्हणजे…”

सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीव खोचक टीका केली होती. “महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यानं काहीही मनमानी करावी, त्याला कुणी काही बोलत नाही. शिवसेना एका मुक्या बायकोसारखी आहे, जिला बोलता येत नाही. आणि काँग्रेसवाले वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती, पण ते बिन बुलाए जेवायला गेले आहेत. त्यांना लाज नाहीये. ते जेवायचं ताटही सोडत नाहीयेत. त्यांना हाणलं तर खाली बसून जेवतील पण ते लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत. नवरा मस्त मजा करतोय. ही मूक बायको, तिला झालेला त्रास सहन करायचा आहे. सवत जर आणली तर माझं काय. म्हणून ते मूक बायकोच्या भूमिकेत आहेत”, असं सुजय विखे पाटील म्हणाले होते.


Post a Comment

0 Comments