आयपीएल २०२२ मधील मोठी कारवाई


 कर्णधाराला केला १२ लाखांचा दंड

पुणे: सनरायझर्स हैदराबाद संघाची आयपीएल २०२२ची सुरूवात अतिशय खराब झाली. काल मंगळवारी झालेल्या राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्यांचा ६१ धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजांनी त्यांची धुलाई केली. राजस्थानने हैदराबादला २११ धावांचे टार्गेट दिले होते. उत्तरादाखल हैदराबादने ३७ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. साामना संपला तेव्हा त्यांनी १४९ धावा केल्या.

राजस्थानविरुद्ध झालेल्या या मोठ्या पराभवामुळे हैदराबादचा संघ गुणतक्त्यात तळाला पोहोचला आहे. गेल्या वर्षी देखील हैदराबादला चांगली कामगिरी करता आली नव्हती. आणि आता नव्या हंगामात देखील त्यांना चांगली सुरूवात करता आली नाही. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन ला झटका बसला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल केनला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

आयपीएलद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर २९ मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने दंड करण्यात आलाय. या नियमानुसार आयपीएलमध्ये एखाद्या संघाने पहिल्यांदा अशी चूक केली तर कर्णधाराला दंड केला जातो. आयपीएल २०२२ मध्ये अशा प्रकारे दंड झालेला केन हा दुसरा कर्णधार ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला या कारणासाठी दंड करण्यात आला होता.

काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकात ६ बाद २१० धावा केल्या. यात कर्णधार संजू सॅमसनने २७ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांसह ५५ धावांची वादळी खेळी केली. या शिवाय देवदत्त पडीक्कलने २९ चेंडूत ४१ धावा, हेटमायरने १३ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल हैदराबदाची अवस्था ५ बाद ३७ अशी झाली. तेथेच राजस्थानने सामना जिंकला होता. हैदराबादच्या फक्त तिघा फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. २० षटकात त्यांना ७ बाद १४९ धावा करता आल्या. राजस्थानच्या या मोठ्या विजयाने गुणतक्त्यात मोठा बदल झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या