उत्तरात काय असेल हे उत्तर आल्यावरच कळेल


 दिलीप वळसे-पाटलांचं सूचक विधान

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर त्यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील विधानसभेत उत्तर देणार आहेत. फडणवीसांच्या उत्तरांना लक्ष्यवेधीनंतर उत्तर द्यायचं की आधी हे कोऑर्डिनेशन कमिटीच्या बैठकीत ठरणार आहे. लक्ष्यवेधीनंतर उत्तर दाखवलं आहे. कोऑर्डिनेशन कमिटीची बैठक आहे. त्यात ठरेल किती वाजता उत्तर द्यायचं. उत्तरात काय असेल ते उत्तर ऐकल्यावरच कळेल, असं सूचक विधान दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आम्ही अजून बॉम्ब टाकणार असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यालाही वळसे-पाटील यांनी उत्तर दिलं आहे. त्यांच्याकडे किती बॉम्ब आहेत आणि ते कशाकशावर फोडणार हे त्यांनाच माहीत, असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला आहे.


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधून हे सूचक विधान केलं. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी ते बचावात्मक पवित्र्यात दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितसा ताणही दिसत होता. आज मात्र दिलीप वळसे पाटील यांनी बॉडी लँग्वेज बदलली होती. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. त्यामुळे फडणवीस यांच्या आरोपांची वळसे पाटील पोलखोल करणार असल्याचे संकेत मिळत आहे. तसेच आजचे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात सरकारी वकिलाकडून होत असलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश केला होता. त्याबाबतचे व्हिडीओ पुरावे एका पेन ड्राईव्हमधून त्यांनी विधानसभा अध्यक्षांना देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. माजी मंत्री आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याबाबत राज्य सरकारकडून कशाप्रकारे षडयंत्र रचलं गेलं याबाबत फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. फडणवीस म्हणाले की, गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मकोका लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या