भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय; ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातील पहिला संघ


 बेंगळुरू: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाने २३८ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांची मालिका २-०ने जिंकली. भारतीय संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग १५वा कसोटी मालिका विजय ठरला असून जगातील कोणत्याही संघाला आजवर अशी कामगिरी करता आली नाही. बेंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या डे-नाईट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने पाहूण्या श्रीलंकेचा २०८ धावांवर ऑलआउट केला.

भारताने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात २५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा पहिला डाव फक्त १०९ धावात संपुष्टात आणला. बुमराहने पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या. टीम इंडियाने दुसऱ्या डावात ९ बाद ३०३ धावा करून श्रीलंकेला ४४७ धावांचे मोठे आणि अवघड आव्हान दिले. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने १ बाद २८ धावा केल्या.

श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात कर्णधार दिमुथ करुणारत्नेने शतकी खेळी केली. त्याने १७४ चेंडूत १५ चौकारांसह १०७ धावा केल्या. तर कुशल मेंडीसने ५४ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेचे हे दोन फलंदाज वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने ४, जसप्रीत बुमराहने ३, अक्षर पटेलने २ तर रविंद्र जडेजाने १ विकेट घेतली.

या विजयासह टीम इंडियाने तिसऱ्यांदा श्रीलंकेचा कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला. याआधी १९९३-९४ आणि २०१७ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. इतक नाही तर भारताचा घरच्या मैदानावरील हा सलग १५वा कसोटी मालिका विजय असेल. याधी भारताने नोव्हेंबर २०१२ साली इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली होती. तेव्हा महेंद्र सिंह धोनी कर्णधार होता. इंग्लंडविरुद्ध झालेल्या त्या मालिकेनंतर भारताने देशात एकही मालिका गमावली नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर एकाही संघाला घरच्या मैदानावर अशी कामगिरी करता आली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या