संघातून बाहेर केल्यानंतर रहाणे, पुजारा यांना आणखी एक झटका

 


मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने खेळाडूंसोबतच्या नव्या केंद्रीय कराराची घोषणा केली आहे. या नव्या करारामध्ये संघातील काही दिग्गज खेळाडूंना जोरदार झटका बसला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना प्लस ग्रेड मिळाली आहे. पण संघातील दोन खेळाडू असे आहेत त्यांना फटका बसलाय.

गेल्या वर्षभरात खराब कामगिरी झाल्याने संघाबाहेर झालेले अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासह ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि विकेटकीपर वृद्धिमान साह यांची ग्रेड कमी कमी करण्यात आल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. बीसीसीआयने ज्या खेळाडूंना करारात घेतले आहे त्याची विभागणी चार गटात केली आहे. सर्वात पहिला गट हा ए प्लस असून त्यातील खेळाडूंना बोर्डाकडून ७ कोटी रुपये मिळतील. त्यानंतर ग्रेड ए असून या गटातील खेळाडूंना ५ कोटी, ग्रेड बी मधील खेळाडूंना ३ आणि ग्रेड सी मधील खेळाडूंना एक कोटी रुपये मिळणार आहेत. सर्व खेळाडूंचा हा नवा करार १ ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ या मुदतीचा आहे.

नव्या कराराच्या आधी पुजारा आणि रहाणे यांनी ग्रेड ए मध्ये होते. आता बीसीसीआयने त्यांना ग्रेड बी मध्ये टाकण्यात आले आहे. येत्या शुक्रवारपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी पुजार आणि रहाणे संघात स्थान देण्यात आले नाही. विकेटकीपर साहाला देखील टीममध्ये जागा मिळाली नाही. ग्रेड बी मध्ये असलेल्या साहाला आता सी मध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वात मोठा फटका हार्दिक पंड्याला बसला आहे. हार्दिक याआधी ग्रेड ए मध्ये होता. आता त्याला ग्रेड सी मध्ये ठेवण्यात आले आहे. हार्दिक २०२१ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपपासून फिटनेसमुळे क्रिकेट मैदानापासून बाहेर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या