विश्लेषण : बेदाणा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर; तरीही काय आहेत आव्हाने ?


द्राक्षापासून बनणाऱ्या बेदाण्याचे उत्पादन यावर्षी विक्रमी होण्याची शक्यता असून निर्यातीतही महाराष्ट्र अग्रेसर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनापासून वाईन आणि बेदाणा असे दोन्ही उपपदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. त्यातही बेदाणा निर्मितीतील महाराष्ट्राचा वाटा देशाच्या एकूण उत्पादनापैकी ९५ टक्के एवढा प्रचंड आहे. बेदाण्याचा हंगाम आता सुरू झाला असून शेतकऱ्यांना यंदा अधिक चांगला परतावा मिळण्याची आशा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात आणि कर्नाटकातील बेळगाव आणि विजयपूर जिल्ह्यात बेदाणा निर्मिती होते.


देशातील उत्पादनाची स्थिती काय ?

महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, आणि नाशिक जिल्ह्यात तसेच कर्नाटकातील विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. गेल्या चार वर्षांत देशात सरासरी १ लाख ८० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होते. त्यापैकी कर्नाटकातील विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यात सरासरी ३० ते ३५ हजार टन बेदाणा तयार होतो. कर्नाटकातील बेदाणाही तासगाव, सांगली आणि सोलापुरात विक्रीसाठी येतो. देशातील एकूण बेदाणा उत्पादनापैकी सुमारे ९५ टक्के बेदाणा राज्यात तयार होतो. त्यापैकी फक्त सांगलीत सुमारे ८० टक्के बेदाणा निर्मिती होते. दर्जेदार बेदाणा निर्मितीसाठी सांगलीचा पूर्व भाग प्रसिद्ध आहे. तासगाव तालुक्याचा पूर्व भाग आणि कवठेमहांकाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेदाणा निर्मिती केंद्रे आहेत.


साठवणुकीची सोय कशी आहे?

बेदाण्याचे उत्पादन आणि देशांतर्गत आणि परदेशातील मागणी याचा चांगला समतोल राखला जातो. शेतकरी आर्थिक गरजेनुसार विक्री करतात. चांगला दर मिळावा म्हणून शीतगृहातच साठवणूक केली जाते. तासगाव, मिरज परिसरात मोठ्या संख्येने शीतगृहे आहेत. या शीतगृहात सुमारे ५० हजार टन बेदाण्याची साठवणूक केली जाते. सण, उत्सव यानुसार त्याची विक्री केली जाते. हा बेदाणा शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा असतो. होळी, दिवाळी, रमजानचा महिना, गणेशोत्सव काळात बेदाण्याला मागणी वाढते. त्यामुळे दरवाढ होते, या दरवाढीचा फायदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो.


निर्यातीची स्थिती ?

सौदी अरेबियासह अन्य आखाती देश, व्हिएतनाम, श्रीलंका, युक्रेन, रशिया, मलेशिया, पोलंड, इंडोनेशिया, तुर्कस्तान, जर्मनी, नेपाळ, त्रिनिदाद, इराक या देशांना प्रामुख्याने बेदाण्याची निर्यात होते. सन २०१७-१८मध्ये २५ हजार २५९ टन, २०१७-१८मध्ये १८ हजार ९२६ टन आणि २०१९-२०मध्ये २४ हजार ६६८ टन बेदाणा निर्यात झाला होता. यंदा विक्रमी उत्पादनासह विक्रमी निर्यात होण्याची शक्यता आहे. जगभरात तासगावचा बेदाणा प्रसिद्ध आहे. तासगावच्या बेदाण्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. पण, जीआयचा फारसा उपयोग शेतकऱ्यांना होताना दिसत नाही.


व्यवसायासमोरील आव्हाने कोणती ?

बेदाणा उद्योगाचा वेगाने विस्तार होत आहे. मात्र, उत्पादन खर्चातही वाढ होत आहे. बेदाणा तयार करण्यासाठी लागणाऱ्या डिपिंग ऑइल, कार्बोनेट, गंधक आणि कोरोगेटेड बॉक्ससाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात सुरळीत नाही. शिवाय कच्च्या मालाच्या दरात सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पॅकिंगला लागणाऱ्या साहित्यातही वाढ झाली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून यंदा बेदाणा उत्पादन खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या उद्योगात काम करण्यासाठी स्थानिक पातळीवर मजूर मिळत नाहीत, त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशमधून मजूर आणावे लागतात, बहुतेक वेळा मागील वर्षी काम केलेले मजूर पुन्हा येतात. नव्याने आलेल्यांना प्रशिक्षण द्यावे लागते. मजुरीचे दरही वाढत असल्याने उत्पादन खर्चावर परिणाम होतो. द्राक्ष वाळविण्याच्या तंत्रज्ञानावर संशोधन होणे गरजेचे आहे. द्राक्षे योग्य प्रकारे वाळण्यासाठी आठ दिवस लागतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा काळ कमी केल्यास वेगाने बेदाणा निर्मिती करणे शक्य होणार आहे. अद्याप तरी या दिशेने फारसे प्रयत्न झालेले नाहीत.


नव्या बाजारपेठेचा शोध ?

युरोपिय देशांना निर्यात वाढण्याची गरज आहे. युरोपिय देशांना निर्यात झाल्यास चांगला दर मिळू शकेल. तासगावची बेदाण्याची बाजारपेठ आशिया खंडात मोठी आहे. मात्र, आता देशातील अन्य बाजारपेठांचा शोध घेणे गरजेचे आहे. देशभरातील बाजारपेठेत बेदाणा गेल्यास मागणी वाढून, त्याचा चांगला परिणाम दरावर दिसून येईल. राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेचा फायदा बेदाण्याला होताना दिसत नाही. या योजनेसह ऑनलाइन विक्रीसाठीचे एक खात्रीशीर व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. तासगावात राज्याच्या विविध भागासह कर्नाटकातून बेदाणा विक्रीसाठी येतो. त्यामुळे दर दबावाखाली राहतात. त्यामुळे सोयी-सुविधांनी युक्त बाजारपेठ निर्मिती आणि विस्तार गरजेचा आहे. जगभर लौकीक असलेल्या या बाजारपेठेकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्षच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या