Breaking News

घरात सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला, औरंगाबादेतली घटना!

 


औरंगाबादः
विकेंडच्या  निमित्ताने रात्री बाहेर जेवायला जाणं औरंगाबादमधील एका जोडप्याला चांगलंच महागात पडलं. संध्याकाळी जेवण्यासाठी म्हणून बाहेर गेलेल्या या जोडप्याच्या घरावर चोरट्यांनी पाळत ठेवली असावी. रात्रीनंतर त्यांच्या घरावर डल्ला मारला. मध्यरात्रीनंतर घरी आल्यानंतर कडीकोयंडा तोडलेल्या अवस्थेत दिसला. घरातलं सामानही अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच घरातील सोन्याचे दागिने आणि इतर मोबाइलही चोरीला गेल्याचे दिसून आले. शहरातील न्यू हनुमान नगरात हा प्रकार घडला. पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमध्ये याविषयीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


कधी घडली घटना?

याविषय़ी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मागील आठ महिन्यापासून न्यू हनुमान नगर परिसरात किरायाच्या खोलीत एक तरण आणि तरुणी एकत्र राहतात. हे दोघे 11 मार्च रोजी जेवण करण्यासाठी म्हणून बाहेर गेले. दोघेही झाल्टा फाट्याकडील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. तेथून 12 मार्चच्या सुमारास पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घरी आले. तेव्हा त्यांना दरवाजा उघडला दिसला. घराचा कडी कोयंडा तोडलेला होता. दोघांनी घरात जाऊन पाहिले असता तेथील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी 16 ग्रॅमचे सोन्याचे कडे, पाच ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅमची पिळ्याची अंगठी, दहा ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सात हजार रुपयांचा मोबाइल असा एक लाख 11 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे या जोडप्याने सांगितले. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments