औरंगाबाद महापालिकेचे ‘स्मार्ट सिटी’साठी दीडशे कोटी

 


स्मार्ट सिटीचा हिस्सा भरण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या २५० कोटी रुपयांचे कर्जातील दीडशे कोटी रुपये भरण्यात आले आहेत.

औरंगाबाद :  स्मार्ट सिटीचा हिस्सा भरण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या २५० कोटी रुपयांचे कर्जातील दीडशे कोटी रुपये भरण्यात आले आहेत. तर स्मार्ट सिटीला यापूर्वी देण्यात आलेले ६८ कोटी रुपये महापालिकेने परत मागवल्याची माहिती मनपातील सूत्रांनी सांगितले. शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर एक हजार कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचे ५०० कोटी, राज्य सरकार २५० कोटी आणि महापालिका २५० कोटी असे सूत्र आहे. केंद्र सरकारने ५०० कोटीपैकी २९४ कोटी आणि राज्य सरकारने २५० कोटीपैकी १४७ कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीला उपलब्ध करून दिला. उर्वरित दोन्ही मिळून ३०९ कोटी रुपयांचा निधी हा महापालिकेचा हिस्सा जमा केल्याशिवाय दिला जाणार नसल्याचे केंद्र आणि राज्य सरकारकडून कळविण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत आहे. या मुदतीमध्ये स्मार्ट सिटीने एक हजार कोटीपर्यंत कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यापूर्वीच स्मार्ट सिटीने ७५० कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन करून त्यातील सुमारे ५५० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत.

महापालिकेला २५० कोटी रुपयांचा हिस्सा जमा करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे प्रशासकांनी तातडीने जानेवारी महिन्यात ६८ कोटी रुपये स्मार्ट सिटीमध्ये जमा केले. त्यानंतर उर्वरित निधी भरण्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने राष्ट्रीयीकृत बॅकेकडून कर्ज काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून २५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाच्या रकमेतून १५० कोटी रुपये स्मार्ट सिटीमध्ये भरण्यात आले. उर्वरित शंभर कोटीचा निधी शिल्लक असलातरी हा निधी स्मार्ट सिटीमध्ये भरला जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे मनपाने यापूर्वी जमा केलेले ६८ कोटी रुपये परत मागविण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या