“जेव्हापासून भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटायला लागली…


 आदित्य ठाकरेंचा निशाणा, केंद्रावर गंभीर आरोप!

प्राप्तीकर विभागानं आज सकाळीच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले. यानंतर राज्यातल्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. भाजपाकडून या कारवाईचं समर्थन केलं जात असून महाविकास आघाडीकडून कारवाईचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमवीर प्राप्तीकर विभागानं छापा टाकलेले राहुल कनाल हे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून हे दिल्लीचं महाराष्ट्रावर आक्रमण असल्याचं ते म्हणाले आहेत.


राहुल कनाल आणि संजय कदम यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापे टाकल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून खोचक शब्दांत निशाणा साधला होता. “राहुल कनाल…संजय कदम.. दोघांना आता प्राप्तीकर विभागाच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. नाईटलाईफ गँगच्या सदस्यांना आता रात्रीची झोप लागणार नाही. ये रात की सुबह नही!” असं नितेश राणे ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणतात…

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटू लागल्याचं म्हटलं आहे. “महाराष्ट्रावर आधीही अशी आक्रमणं झाली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणुका लागतील असं समजलं आणि महाविकास आघाडीची भाजपाला भीती वाटायला लागली, तेव्हापासून हे सुरू आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“उत्तर प्रदेशात असं केलेलं, हैदराबादमध्ये असंच केलेलं, पश्चिम बंगालमध्ये देखील असंच केलेलं. आता महाराष्ट्रात निवडणुका येत आहेत, म्हणून इथेही तसंच करत आहेत. सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या प्रचार यंत्रणाच झालेल्या आहेत. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही. ही तर भाजपाची प्रचार यंत्रणाच आहे. लोकशाही राहिली कुठेय?” असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या