ऊसतोड महामंडळास गुढी पाडव्याचा मुहूर्त


ऊसतोड महामंडळाची घोषणा, त्याची स्थापना व त्यासाठी दोन वेळा निधीची तरतूद झाल्याची विधिमंडळात घोषणा झाल्यानंतर रडत-रखडत आठ दिवसांपूर्वी कंपनी कायद्याखाली या महामंडळाची नोंदणी पूर्ण झाली. 
सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : ऊसतोड महामंडळाची घोषणा, त्याची स्थापना व त्यासाठी दोन वेळा निधीची तरतूद झाल्याची विधिमंडळात घोषणा झाल्यानंतर रडत-रखडत आठ दिवसांपूर्वी कंपनी कायद्याखाली या महामंडळाची नोंदणी पूर्ण झाली. गुढीपाडव्या दिवशी या महामंडळाचे कार्यालय एका भाडय़ाच्या इमारतीमध्ये सुरू केले जाणार आहे. या महामंडळाच्या आकृतिबंधाचा प्रस्तावही राज्याच्या उच्चाधिकार समितीकडे अजून प्रलंबित आहे. दरम्यान हंगाम सुरू असणाऱ्या १८७ कारखान्यांपैकी ९० कारखान्यांनी त्यांच्याकडील ऊसतोड कामगारांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पटलावर बहुचर्चित असणाऱ्या महामंडळाचे कामकाज सुरू करण्यास सरकारला पाडव्याचा मुहूर्त सापडले असल्याचे दिसून येत आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऊसतोड महामंडळ करण्याची घोषणा करण्यात आली. पण हे महामंडळ फडणवीस सरकारच्या काळात सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांना वारंवार यावरून प्रश्न विचारले गेले. त्यामुळे हे महामंडळ स्थापन करणे ही राजकीय खेळी असल्यासारखे वातावरण निर्माण करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने कामगार विभागाकडील हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली घेतले. प्रतिटन गाळपामागे दहा रुपये ऊसतोड कामगार कल्याण निधी म्हणून साखर कारखान्यांनी द्यावा असा निर्णय घेण्यात आला. पण महामंडळ नोंदणीची प्रक्रिया कमालीची संथ गतीने झाल्याने विधिमंडळात आर्थिक तरतूद होऊनही कामकाज काही सुरू होऊ शकले नाही. आठ दिवसांपूर्वी कंपनी कायद्यानुसार त्याची नोंदणी पूर्ण झाली आहे. यामध्ये  अध्यक्ष व ११ संचालक ठरविण्यात आले असून यामध्ये साखर संचालक, सहकार संचालक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, महात्मा फुले महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे शासकीय सदस्य असणार आहेत. या प्रत्येकाची पडताळणी व कागदपत्रे जमा करण्यास झालेल्या विलंबामुळे कामकाज सुरू होऊ शकले नाही.  एका बाजूला हे काम सुरू असतानाच ऊसतोड मुलामुलींसाठी २० वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या वसतिगृहाच्या भाडय़ाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच ऑनलाइन नोंदणीतून ९० हजार ऊसतोड मजुरांची सांख्यकीय माहिती उपलब्ध झाली आहे.  तुलनेने संथ गतीने सुरू असणाऱ्या या कामाला आता गती देण्यात येणार असून गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आता कार्यालयही सुरू होणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीत या कामाचा पाठपुरावा केला. पाडव्याच्या मुहुर्तावर ऊसतोड महामंडळाचे कार्यालय पुणे येथे भाडय़ाच्या इमारतीमध्ये सुरू होणार आहे. तसेच महामंडळातील आकृतिबंध मंजुरीचा प्रस्तावही उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात आला आहे. या कामाला आता वेग येईल असा दावा केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या