भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या


 सामना सुरू असताना २० राउंड फायरिंग केले

नवी दिल्ली: पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सोमवारी १४ मार्च रोजी एक धक्कादायक घटना घडली. काही अज्ञात हल्लेखोरांनी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल (वय-३८) याची गोळ्या घालून हत्या केली. संदीप यांच्या डोक्यावर आणि छातीवर जवळपास २० राउंड फायर करण्यात आले. धक्कादायक म्हणजे हा प्रकार कबड्डी सामान सुरू असताना झाला.

शाहकोट येथील मल्लिया कला गावात एक कबड्डी स्पर्धा सुरू होती. जालंधर ग्रामीण पोलिस उपाधिक्षक लखविंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप नांगलला ८-१० गोळ्या मारण्यात आल्या. ही घटना संध्याकाळी ६.१५ ते ६.३० दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिस चौकशी सुरू केली असून त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार संदीप नांगल या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. ही घटना घडली तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. संदीपला गोळ्या घातल्यानंतर एकच खळबळ उडाली. उपस्थित प्रेक्षक जीव वाचवण्यासाठी वाट मिळेल तिकडे पळू लागले. या गोंधळात एका युवकाच्या पायाला दुखापत झाली.

संदीपने एक दशकाहून अधिक काळ कबड्डीवर राज्य केले. तो भारताशिवाय, कॅनडा, अमेरिका आणि युके या देशाकडून देखील खेळला. संदीपला दोन मुल आहेत ती सध्या लंडनमध्ये आहेत. संदीप देखील लंडनमध्ये स्थायीक असून पंजाबमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी आणि कबड्डी स्पर्धेसाठी तो आला होता. संदीपचा समावेश जगातील पाच अव्वल खेळाडूमध्ये होत होता. त्याने कबड्डी वर्ल्डकप स्पर्धेत युकेच्या कबड्डी संघाचे नेतृत्व देखील केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या