इंधन दरवाढीवर प्रश्न विचारला असता नितीन गडकरी म्हणाले


“…त्यावर आपण काहीच करु शकत नाही”

मागील पाच दिवसांमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ३ रुपये २० पैशांनी वाढलेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी इंधन दरवाढीचं समर्थन केलं. मागील पाच दिवसांमध्ये इंधनाचे दर चारदा वाढले असतानाच गडकरींनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा संदर्भ दिलाय. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे तेलाचे दर वाढले असून या युद्धाचा मुद्दा हा भारत सरकारच्या नियंत्रणातील नसल्याचं गडकरी म्हणालेत.

एबीपी नेटवर्कच्या ‘आयडीयाज ऑफ इंडिया’ या कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरी यांनी इंधन दरवाढ आणि इतर राजकीय विषयांवरही भाष्य केलंय. “देशामध्ये ८० टक्के तेल आयात केलं जातं. सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेत आणि त्यावर आपण काहीच करु शकत नाही,” असं गडकरींनी म्हटलंय. पेट्रोल डिझेलचे वाढते दर या इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या नियोजनासंदर्भात नितीन गडकरींना प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलंय.

२००४ पासूनच मी भारताने इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचं सांगतोय असं गडकरी म्हणाले. “आपण आपलं इंधन निर्माण केलं पाहिजे,” असं सांगत असल्याचं गडकरी म्हणाले. देशांतर्गत इंधननिर्मितीवर काम करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.

मागील पाच दिवसांमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ३ रुपये २० पैशांनी वाढलेत. आजही (२६ मार्च २०२२ रोजी) इंधनाचे दर ८० पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. १३७ दिवसांनंतर २२ मार्च रोजी इंधनाचे दर पहिल्यांना वाढवण्यात आले. ८० पैसे प्रति लिटरने ही इंधन दरवाढ झाली. उत्तर प्रदेश आणि गोव्याबरोबर एकूण पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ नोव्हेंबर ते २१ मार्चदरम्यान इंधनाच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.

भारतात लवकरच ४० हजार कोटींचं इथेनॉल, मिथेनॉल आणि बायो-इथेनॉलची बाजारपेठ असेल, यामुळे पेट्रोलियम आयातीवरील आपण अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी होईल असं गडकरींनी म्हटलंय. देशातील कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्या सध्या फ्लक्स फ्युएलवर काम करणाऱ्या इंजिनसच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत असून काही महिन्यांमध्ये हे तंत्रज्ञान विकसित होईल असं गडकरी म्हणालेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या