पुणे जिल्ह्यात वीजबिल थकबाकी ३१०९ कोटींवर

 थकबाकी न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित होणारपुणे :
जिल्ह्यातही वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर सध्या वाढत चालला आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे तसेच सार्वजनिक सेवा आणि इतर सर्व वर्गवारीतील ९ लाख ४३ हजार ५६४ ग्राहकांच्या वीजबिलांची थकबाकी ३१०९ कोटींवर गेली आहे. या थकबाकीमुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी महावितरणकडून पुणे जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी थकबाकीची वसुली आवश्यक झाली आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. करोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे जनजीवन सुरळीत आहे. सोबतच वाढत्या उन्हामुळे सर्वच वर्गवारीमध्ये वाढत्या वापराने विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर निर्माण होत असल्याने थकबाकी वसुलीला वेग देण्यात आला आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी सहकार्य करून थकीत आणि चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. वीजखरेदी, दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती खर्च, कर्जाचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च आदींचा सर्व खर्च वीजबिल वसुलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी वीजबिलांचा प्राधान्याने भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना  http://www.mahadiscom.in हे संकेतस्थळ आणि मोबाइल अॅयपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक आणि घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

घरगुती ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी

पुणे जिल्ह्यात घरगुती ६ लाख ३० हजार ५८१ ग्राहकांकडे १३७ कोटी २७ लाख रुयांची सर्वाधिक थकबाकी आहे. वाणिज्यिक ८८ हजार ६६ ग्राहकांकडे ४३ कोटी ५० लाख, औद्योगिक ११ हजार ५८२ ग्राहकांकडे १८ कोटी ५६ लाख रुपये तसेच कृषी

३ लाख १२ हजार ९८३ ग्राहकांकडे २३२४ कोटी ३५ लाख आणि पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे ५६८ कोटी १९ लाख व सार्वजनिक सेवा वर्गवारीसह सर्व ग्राहकांकडे एकूण ३१०९ कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये कृषी ग्राहकांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत २३२४ कोटी ३५ लाखांपैकी ५० टक्के थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना उर्वरित थकबाकी माफ करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या