महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : स्मृतीची प्रकृती स्थिर


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात फलंदाजीदरम्यान भारताची सलामीवीर स्मृती मानधनाच्या डोक्यावर चेंडू आदळला. त्यामुळे तिला मैदान सोडावे लागले होते. मात्र, तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी दिली.

आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माइलने टाकलेला उसळणारा चेंडू डावखुऱ्या स्मृतीच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर भारतीय संघाच्या डॉक्टरांनी तपासणी केली. त्यावेळी तिला फलंदाजी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली; पण पुढच्याच षटकात ती मैदानाबाहेर गेली. त्यानंतर आफ्रिकेच्या डावात ती क्षेत्ररक्षणासाठी आली नाही. मात्र, हे पाऊल केवळ खबरदारी म्हणून उचलण्यात आल्याचे ‘बीसीसीआय’ सांगितले.

‘‘स्मृतीच्या डाव्या कानाच्या खालच्या बाजूला चेंडू लागला. त्यामुळे तिला फलंदाजी करताना त्रास जाणवत होता. याच कारणाने तिने मैदानाबाहेर येण्याचा निर्णय घेतला. तिला खबरदारी म्हणून उर्वरित सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली. सध्या तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे,’’ असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले. स्मृती लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होणे अपेक्षित असून तिला विश्वचषकात खेळत राहण्याची मुभा मिळेल. भारताचा पुढील सराव सामना वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणार असून त्यानंतर ६ मार्चला होणाऱ्या सलामीच्या लढतीत भारतापुढे पाकिस्तानचे आव्हान असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या