महाविकास आघाडीत शिवसेनेचे २५ आमदार नाराज


 संजय राऊत म्हणाले, “तेवढाच अधिकार आणि हक्क….”

एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यावर या आमदारांची समजूत काढण्याची जबाबादारी

महाविकास आघाडीच्या निमित्ताने राज्यात तीन पक्षांचं सरकार आलं असलं तरी अनेकदा त्यांच्यातील वाद उघडपणे समोर येत असतात. भाजपाकडूनही वारंवार तीन चाकांची रिक्षा असा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात असते. तिन्ही पक्षांचे नेतेही अनेकदा एकमेकांविरोधात वक्तव्यं करत आरोप प्रत्यारोपांचा फैरी झाडत असतात. त्यातच आता शिवसेनेचे २५ आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत असून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

शिवसेनेचे २५ आमदार हे निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज आहेत. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना निधीवाटपात मतभेद होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या काही आमदारांनी जाहीरपणे पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यावर या आमदारांची समजूत काढण्याची जबाबादारी उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे.

दरम्यान संजय राऊतांना याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्या पत्राबाबत चर्चा झालेली आहे. निधी वाटपातील असंतोषाबाबत हे पत्र आहे. २५ किंवा त्यापेक्षा जास्त आमदारांनी भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या असतील तर त्यात काही गैर आहे असं मला काही वाटत नाही. प्रत्येक आमदाराचा निवडून आलेल्या राज्य सरकारच्या निधीवर तेवढाच अधिकार आणि हक्क आहे मग तो कोणताही पक्ष असो”.

ईडीविरोधात नरेंद्र मोदींना पत्र –

“जे सत्य आहे, जो अन्याय आहे त्याला टार्गेट म्हणू नका. समोरच्या काही प्रमुख लोकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे समोर आणले जात आहेत. काही विशिष्ट लोक आमच्यावर हल्ले करतात आणि त्याचवेळी मोठे घोटाळे करुन नामनिराळे राहतात. त्यांचे मुखवटे फाडले पाहिजेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“ईडी संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे १३ पानांचे पुराव्यासह पत्र दिलं आहे. अनेक पत्रकारांनी ते पत्र मीडियासमोर, देशासमोर ठेवण्याची विनंती केली आहे. ते पत्र मी आज देणार आहे. त्या पत्रावरुन केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरल्या आहेत, कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात आणि राजकीय विरोधकांची कोंडी करुन, अडचणीत आणून भाजपाच्या राजकारणाला हातभार लावतात हे सगळं आहे. हे टप्पयाटप्याने बाहेर येईल. आज पहिला भाग बाहेर काढत आहे,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

एक्झिट पोल खोटे ठरतील –

“एक्झिट पोलवर जाऊ नका. यापूर्वीही याचा फज्जा उडाल्याचा बघितलं आहे. १० तारखेला प्रत्यक्ष मतपेटीतून काय बाहेर येतं त्यावर मत व्यक्त करुयात. या देशातील अनेक राज्यांमध्ये प्रस्थापितांविरुद्ध राग आहे आणि तो मतपेटीतून स्पष्ट दिसेल. एक्झिट पोल खोटे सिद्ध होतील असा मला विश्वास आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या