पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद


३५ मिनिटांच्या फोन कॉलमध्ये…

 रशिया युक्रेन युद्धाचा आज १२वा दिवस आहे. त्यातच आता रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनला आवाहन केले आहे. रशियाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तरच युक्रेनवरील लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी सांगितले. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांची तुलना त्यांनी युद्धाशी केली.


दरम्यान, रशियन सैन्याने वेढा दिलेल्या मारियुपोल या बंदरांच्या शहरामध्ये युद्धविराम पाळण्याचा दुसरा प्रयत्नही रविवारी फोल ठरला. युद्धग्रस्त भागातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. याचे खापर रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनचे लष्कर यांनी एकमेकांवर फोडले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आजपर्यंत तो देश सोडणाऱ्यांची संख्या सुमारे १५ लाखांहून अधिक झाली आहे. युक्रेनच्या नागरिकांनी युरोपातील शेजारी राष्ट्रांमध्ये आश्रय घेतला आहे.

मोदींनी युक्रेन सरकारचे मानले आभार

युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले. सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये पंतप्रधानांनी युक्रेन सरकारकडून पाठिंबा मागितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधान मोदींची युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर बातचीत

पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. फोन कॉल सुमारे ३५ मिनिटे चालला. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली असून पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या थेट संवादाचे कौतुक केले. अशी माहिती भारत सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या