“असल्या गोष्टीला…”; राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मूक बायको म्हणणाऱ्या सुजय विखेंना अजित पवारांचे प्रत्युत्तर


सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला नवरा, बायको आणि वरातींची उपमा देऊन खोचक टोला लगावला होता

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर केला जात असल्याची टीका राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर ईडी, सीबीआय यांच्या कारवायांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले असताना भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला नवरा, बायको आणि वरातींची उपमा देऊन खोचक टोला लगावला. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखेंना प्रत्तुत्तर दिले आहे.


“ज्यांना उद्योग नाहीत ते टिका टिप्पणी करतात. माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की, असल्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्यापेक्षा उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे मी इथे येऊन पटापट निर्णय घेतले आहेत. त्याला महत्त्व द्यायला हवं. ज्यांना आता उद्योग नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्यांना उत्तर द्यायचे. याच्यातून मी काय साधणार आणि राज्यातली जनता काय साधणार आहे याचाही विचार केला पाहिजे. ज्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशांना आम्ही उत्तर देऊ. त्यांच्या वक्तव्याला फार काही महत्त्व देण्याचे कारण नाही,” असे अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले होते सुजय विखे पाटील?

“महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यानं काहीही मनमानी करावी, त्याला कुणी काही बोलत नाही. शिवसेना एका मुक्या बायकोसारखी आहे, जिला बोलता येत नाही. आणि काँग्रेसवाले वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती, पण ते बिन बुलाए जेवायला गेले आहेत. त्यांना लाज नाहीये. ते जेवायचं ताटही सोडत नाहीयेत. त्यांना हाणलं तर खाली बसून जेवतील पण ते लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत. नवरा मस्त मजा करतोय. ही मूक बायको, तिला झालेला त्रास सहन करायचा आहे. सवत जर आणली तर माझं काय. म्हणून ते मूक बायकोच्या भूमिकेत आहेत”, असं सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.

आम्ही त्यांना चोऱ्या करायला लावल्या नव्हत्या

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्यावरूनही सुजय विखेंनी भाष्य केले. “आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला लावल्या नव्हत्या. त्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले..देशात सत्तेचा वापर कुणी जास्त केला आहे, हे आणीबाणीच्या काळात देशाच्या जनतेनं पाहिलं आहे. कश्मीर पंडितांवर झालेला अत्याचार देखील जनतेसमोर आला आहे. ज्या लोकांनी पैसे खाऊन कारखाने बांधले, संस्था केल्या हा गरीब जनतेचा पैसा नव्हता का?” असा सवाल सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या