महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून बिगुल

 


शहर वायू वितरिकेच्या भूमिपूजन सोहळय़ात शक्तिप्रदर्शन



औरंगाबाद
: औरंगाबाद शहरातील नैसर्गिक वायूवाहिनी टाकण्याच्या भूमिपूजन सोहळय़ात बुधवारी भाजपने शक्तिप्रदर्शन केले. सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रणे तर दिली पण भाजपाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने आल्याने चार हजार कोटींची गुंतवणूक असणाऱ्या या प्रकल्पाचे श्रेय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे असल्याने त्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यक्रमात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका करण्यात आली. या योजनेचे भूमिपूजन हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे करण्यात आले.

अहमदाबाद ते विशाखापट्ण्णम जाणाऱ्या नैसर्गिक वायू वाहिनीस श्रीगोंदा येथून औरंगाबादपर्यंत वळविण्याचा प्रस्ताव या खात्याचे मंत्री धर्मेश प्रधान असताना डॉ. कराड यांनी दिला होता. अर्थ राज्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केल्याने या प्रकल्पाचे काम आता सुरू करण्यात आले आहे. चार लाख घरांना जोडणी देण्यात येणार असून उद्योगांनाही मोठा फायदा होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. भाजप नेत्यांनी गॅस प्रकल्पाच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सुरुवात आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली. ते म्हणाले, ‘काही जणांनी २०-२० वर्षे खासदार म्हणून काम केले. पण एकही योजना त्यांना सुरू करण्यात आली नाही. एक योजना कशीबशी आणली ती पाठीवर घेतली पण तिला खाली काही उतरवले नाही.’ या टीकेला टोकदार रूप देत राज्यमंत्री डॉ. कराड यांनीही ५५ किलोमीटरची पाणी योजना सुरू करण्यास अपयश आले असून अजून केंद्र सरकारकडे परवानगी साधे अर्जही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी राज्य सरकारच दोषी असल्याचा आरोप केला. अर्थ राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाठपुरावा केलेल्या कामांची यादीच त्यांनी वाचून दाखविली. स्मार्ट सिटीच्या सर्व योजनांचे श्रेय केंद्र सरकारचे असल्याचे ते म्हणाले. राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही माजी खासदारांवर टीका केली. काम होत असले की त्याची सूचना केली होती असे सांगण्याची सवयच असल्याचे सांगत ते म्हणाले, गॅस प्रकल्पाचा प्रस्ताव सूरजितसिंग बर्नाला असताना आपण दिला होता असेही सांगण्यात आले. पुण्यासाठी सुरू केलेल्या अत्याधुनिक रेल्वेसाठी ममता बॅनर्जीला आपण सांगितले होते, असेही सांगण्यात आले असे सांगत माजी खासदारांवर टीका केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या