‘बीसीसीआय’च्या सभांसाठी वेंगसरकर यांची नियुक्ती


‘‘ शनिवारी कोणत्याही वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले नव्हते. ही सभा लांबणीवर टाकली आहे.

मुंबई : विरोधी गटाने माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) प्रतिनिधित्व म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु अध्यक्ष विजय पाटील आणि सचिव संजय नाईक यांच्या अनुपस्थितीमुळे ‘एमसीए’च्या या सभेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

‘‘शनिवारी कोणत्याही वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले नव्हते. ही सभा लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे या बैठकीसंदर्भात माहिती नाही,’’ असे नाईक यांनी सांगितले. रवी सावंत व रवी मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गटाने आयोजित केलेल्या बैठकीला १०९ अधिकृत स्वाक्षरीकर्ते सदस्य उपस्थित होते. या सभेत सत्ताधारी गटाने घेतलेले निर्णय विरोधी गटाने बदलले. या बैठकीला कोषाध्यक्ष जगदीश आचरेकर उपस्थित होते. पण, त्यांनी स्वाक्षरी केली नाही.  क्रिकेट सुधार समिती बरखास्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या त्रिसदस्यीय समितीत विनोद कांबळी, जतीन परांजपे आणि निलेश कुलकर्णी यांचा समावेश आहे. पण, सलील अंकोला यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या वरिष्ठ निवड समितीला कायम ठेवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या