शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा नवा प्रकार

 


अहमदनगर:
शेतीमाल खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार नवीन नाहीत. कधी पैसे देण्याचे आश्वासन न पाळून, कधी बनावट धानदेश देऊन तर कधी अन्य मार्गाने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येते. नगर जिल्ह्यात ऑनलाइन सुविधेच्या मदतीने शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय माल भरलेल्या गाड्या जाऊ देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्याने घेतली होती. त्यामुळे व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या खात्यात आरटीजीएस करून पैसे पाठविले खरे, मात्र माल ताब्यात मिळून गाड्या रवाना झाल्यानंतर बँक खाते होल्ड केले. तब्बल १४ लाख ५० हजार रुपयांचा संत्री विक्रीचा हा व्यवहार होता.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनाही तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला. व्यापाऱ्यांचा ठाव ठिकाणा शोधून त्यांना अटक करून आणले. त्यांच्याकडून पैसे वसूल केले आणि संबंधित शेतकऱ्याला दिले. नगर तालुक्यातील वाळकी येथील तरुण शेतकरी संदीप मधुकर तावरे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अमोल ज्ञानेश्‍वर फुटाणे (रा. सिंधुरजनाघाट ता. वरूड जि. अमरावती), मायनुल इसलाम करीम इस्लाम (रा. जेलियाखाली ता. संदेशखाली जि. नाँर्थ परगाना, पश्‍चीम बंगाल) यांना अटक केली आहे. आणखी एक आरोपी एम. डी. कलीमोद्दीन (रा. एअरपोर्टजवळ, कोलकत्ता, पश्‍चीम बंगाल) याचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या दोघांना पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १४ लाख ५० हजार रुपये वसूल करून शेतकऱ्याला परत केले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात फसवणुकीची ही घटना घ़डली होती. १४ ते १७ फेब्रुवारी या काळात हे व्यापारी तावरे यांच्या शेतात संत्री खरेदीसाठी आले होते. त्यांचा व्यवहार ठरला. त्यानुसार संत्री तोडून वाहनात भरली. मात्र, अशा बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते, हे लक्षात घेऊन तावरे यांनी पैसे दिल्याशिवाय माल भरलेली वाहने जाऊ न देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार व्यापाऱ्यांनी तावरे यांच्या खात्यावर १४ लाख ५० हजार रुपये आरटीजीएस द्वारे पाठविले. तसा संदेश तावरे यांच्या मोबाईलवर आला. पैसे आल्याचा संदेश आल्यानंतर तावरे यांनी वाहने जाऊ दिली.

मात्र, काही वेळानंतर त्या व्यापाऱ्यांनी बँक खाते होल्ड केले. त्यामुळे शेतकरी तावरे यांना प्रत्यक्षात पैसे मिळालेच नाहीत. तोपर्यंत माल भरलेली वाहने राज्याबाहेर गेली होती. आपली अशा पद्धतीने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तावरे यांनी नगर तालुका पोलिस स्टेशन गाठले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना घडलेली घटना सांगितली. सानप यांनी गुन्हा दाखल करून व्यापाऱ्यांचा शोध सुरू केला. त्यांचा ठाव ठिकाणी मिळाल्यानंतर फौजदार युवराज चव्हाण, गायत्री धनवडे, विक्रांत भालसिंग, विशाल टकले यांनी तपास करून आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या