आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धामध्ये खेळता येत नसल्याचे शल्य नाही!; भारताचा बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीच्या भावना


आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळत नसल्याचे शल्य नसून माझे कायमच खेळात सुधारणा करून कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असते, अशा भावना भारताचा अव्वल बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने व्यक्त केल्या.

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळत नसल्याचे शल्य नसून माझे कायमच खेळात सुधारणा करून कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य असते, अशा भावना भारताचा अव्वल बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने व्यक्त केल्या. ३६ वर्षीय पंकजने नुकतेच आठव्यांदा आशियाई अजिंक्यपद बिलियर्डस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. हे त्याचे एकूण १२वे आशियाई आणि तब्बल ४१वे आंतरराष्ट्रीय जेतेपद ठरले. या वर्षांच्या सुरुवातीला पंकजला करोनाची बाधा झाली होती. मात्र, त्यातून सावरून त्याने मार्च महिन्यात दोहा येथे सलग तीन स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने आशियाई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्याच ध्रुव सितवालाला सहा फ्रेममध्ये पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली.

‘‘मी माझ्या प्रदीर्घ कारकीर्दीत पहिल्यांदाच सलग तीन स्पर्धात खेळलो. करोनाची बाधा झाल्यानंतर मला शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त करण्यासाठी थोडा अवधी लागला. पहिल्या दोन स्पर्धामध्ये अपेक्षित कामगिरी करता न आल्याने अखेरच्या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्याचा माझा मानस होता. पुन्हा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावल्याचे समाधान आहे,’’ असे पंकज म्हणाला.


या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धाही होणार असून बिलियर्ड्स खेळ या स्पर्धाचा भाग नाही. मात्र, २३ वेळा विश्वविजेता पंकज या गोष्टीचा फारसा विचार करत नाही. ‘‘आपल्या देशात आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक या स्पर्धाना अतिरिक्त महत्त्व दिले जाते. मात्र, या स्पर्धात खेळता येत नसल्याचे मला शल्य नाही. या स्पर्धा चार वर्षांच्या कालावधीने होतात. त्यापेक्षा दरवर्षी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात सातत्यपूर्ण कामगिरी करणे अधिक अवघड असल्याची माझी भावना आहे. माझ्या मते, प्रत्येकच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळाडूच्या दृष्टीने महत्त्वाची असते,’’ असे पंकजने नमूद केले.

पंकजने याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके (२००६ आणि २०१०) मिळवली आहेत. २०१० नंतर बिलियर्ड्स खेळ आशियाई स्पर्धेचा भाग नसून २०३०मध्ये या खेळाचे पुनरागमन होणार आहे.

बिलियर्ड्समध्ये कारकीर्द घडवण्याची हीच वेळ!

भारतात बिलियर्ड्स आणि स्नूकरमध्ये कारकीर्द घडवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत पंकजने व्यक्त केले. ‘‘विविध तेल कंपन्या किंवा रेल्वेमध्ये बिलियर्ड्स आणि स्नूकरपटूंना नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. आता कनिष्ठ वयोगटांतही दर्जेदार खेळाडू पुढे येत आहेत. त्यांना याच खेळात कारकीर्द घडवायची आहे. त्यांना सरकार आणि अन्य संघटनांनी प्रोत्साहन देणे, साहाय्य करणे आवश्यक आहे. बिलियर्ड्स हा श्रीमंत व्यक्तींचा खेळ असल्याचा आपल्याकडे समज आहे. मात्र, त्यात तथ्य नाही,’’ असे पंकजने सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या