“भर चौकात फटके मारायला पाहिजेत,”

 


अमेय खोपकर संतापले; मिटकरी उत्तर देत म्हणाले “लढाया वाघास बोलवा रे…”

“राष्ट्रवादीच्या अशा फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत,” अमेय खोपकरांचं ट्वीट

राज्यात सोमवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्कात राज ठाकरेंच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषात शिवजयंती साजरी केली तर दुसरीकडे मुख्यमंत्रीही विमानतळाबाहेर असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान तिथीवरुन शिवजयंती साजरी करण्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी जाहीर केली होती. विधीमंडळातही भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं होतं. दरम्यान शिवजयंतीचा हा वाद अद्यापही सुरुच आहे.

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन मनसे नेत अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान आपापसात भिडले होते. यावेळी त्यांनी एकमेकांची अक्कल काढली होती. अमोल मिटकरी यांनी शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली होती. यामध्ये व्होट बँकचं राजकारण दिसतंय, असंही ते म्हणाले होते. यावर अमेय खोपकरांनी “आपण दरवर्षी दिवाळी, गणपती आणि हिंदू धर्माचे सण साजरे करतो ते तारखेनुसार साजरे करत नाही. महाराष्ट्रातील नव्हे, देशातील नव्हे जगातील सर्व लोकांसाठी छत्रपती शिवाजी महारांची जयंती हा एक सण आहे,” असं म्हटलं होतं.

दरम्यान त्यांच्यातील हा वाद ट्विटरवरतीदेखील सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. “तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत,” असं म्हणत मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत अप्रत्यक्षपणे अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवारांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याचा मुद्दा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित केला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर उत्तर दिलं.


“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिथी किंवा तारखेचा वाद नको…ते आपले दैवत आहे हे त्रिवार सत्य आहे. पण मागील काळात आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा स्वर्गीय रामकृष्ण मोरे एका खात्याचे मंत्री होते. त्यांनी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली झाला हे रेकॉर्डवर आणलं. तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरीवर जाऊन अभिवादन करुन जयंती साजरी करतात. ही परंपरा कायम असून सर्व मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.


“सरकारच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तिथे गेले होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवसेना तिथीनुसार जयंती साजरी करत आली आहे. आम्हीदेखील सरकारमध्ये असताना तारखेप्रमाणे साजरी करायचो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, भाजपा कोणत्याही पक्षाच्या सदस्याला तिथीप्रमाणे जयंती साजरी कराची असेल तर महाराजांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करु शकतात. कारण नसताना वेगळी चर्चा नको. सरकारी अधिकाऱ्यांना १९ फेब्रुवारीला सुट्टी देतो त्याप्रमाणे ते साजरी करतात. आज सुट्टी नसून काम सुरु आहे,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या