गौरी गडाख आत्महत्या प्रकरण विधानसभेत, गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर…


नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची सून आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या वहीणी गौरी प्रशांत गडाख यांच्या आत्महत्येचे प्रकरण विधानसभेत पोहचले आहे.

 अहमदनगर : भाजपचे आमदार राम कदम यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यासंबंधी काय कार्यवाही केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर वैदयकीय अहवालानुसार ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत असल्याचे उत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. या प्रकरणी न्यायालयातही सुनावणी प्रलंबित आहे. आता विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने मंत्री गडाख यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये गौरी यांनी घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली होती.

त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे पती प्रशांत यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. ‘ज्या कारणाने तू हा निर्णय घेतला असेल, त्याला शिक्षा नक्की मिळेल, अगदी कुणी रक्ताच्या नात्याचे असले तरी,’ असे प्रशांत यांनी या पोस्टमध्ये नमूद केले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

त्यानंतर आता आमदार कदम यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात यासंबंधी प्रश्न उपस्थित केला. नगरमध्ये या विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. राजकीय दबावापोटी मयत विवाहितेचे पती व आई, वडिलांचे जबाब न नोंदविणे यासह अन्य प्रकार संशयास्पद आहेत. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपविण्याबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या