Breaking News

गर्भवतींशी संवादासाठी डाॅक्टरांच्या मदतीला रुग्णवाहिका चालक!


भाषेची अडचण आणि अंधश्रद्धेचा पगडा अशा स्थितीत कोरकू भाषा जाणणारे स्थानिक रुग्णवाहिका चालक आदिवासी कुटुंबांशी संवाद साधून त्यांना सर्व काही समजून सांगतात.

अमरावती : मेळघाटातील आदिवासी भागाला कुपोषणाचा शाप आहे. अंधश्रद्धेमुळे महिलांचा आरोग्य यंत्रणेवर अविश्वास. घरगुती उपचारावर भर. गर्भवती महिलांशी संवाद साधणे ही डॉक्टरांसाठी अवघड बाब ठरते. त्यासाठी रुग्णवाहिकांचे चालक उपयोगी पडू लागले आहेत. ओळखीच्या व्यक्ती आणि त्यांचीच भाषा यामुळे या चालकांचा उपयोग दुभाषे म्हणूनही होऊ लागला. या चालकांच्या मदतीने डॉक्टरांना अधिकाधिक गर्भवती महिला आणि बालकांची तपासणी करणे शक्य झाले आहे.

आदिवासी भागातील गर्भवती महिलांशी संवाद साधून त्यांना उपचारांकरिता तयार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांच्या चालकांचा किती उपयोग होऊ शकतो, हे प्रत्यक्षात दिसून आले आहे. मेळघाटात माता आणि बालमृत्यूंचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन विशेषज्ञ डॉक्टरांना त्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या भागांतील शासकीय सेवेतील स्त्रीरोग आणि बालरोगतज्ज्ञांना १५ दिवसांच्या प्रतिनियुक्तीवर त्या भागात पाठवण्यात येते. या डॉक्टरांना तेथील आदिवासींशी थेट संवाद साधणे कठीण होते. भाषेची अडचण आणि अंधश्रद्धेचा पगडा अशा स्थितीत कोरकू भाषा जाणणारे स्थानिक रुग्णवाहिका चालक आदिवासी कुटुंबांशी संवाद साधून त्यांना सर्व काही समजून सांगतात.

मेळघाटात कुपोषणमुक्ती आणि आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून राबवलेले ‘मिशन २८’ देखील प्रभावी ठरले आहे. मेळघाटात पाड्यांवर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गृहभेटी, आवश्यक उपचार, सल्ला आणि पाठपुरावा याद्वारे २८ दिवस मोहीम राबवण्यात आली.

मोहिमेदरम्यान उपचारांबरोबरच समुपदेशन आणि जनजागृती हा घटक महत्त्वपूर्ण ठरला. कमी वजन असलेल्या एका बालकाला रुग्णालयात दाखल करण्याबाबत त्याचे पालक तयार नव्हते, पण आरोग्य पथकांनी केलेल्या प्रभावी समुपदेशनाने कुटुंबीयांचे मन वळवण्यात यश मिळाले. एका मातेच्या अंगावर सूज आणि लघवीत प्रोटीन आढळून आले. तिला वेळीच उपचार मिळाल्याने ती सुखरूप आहे. या मोहिमेत आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भरारी पथक, समुदाय अधिकारी, आरोग्यसेविका, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांचा सहभाग होता.


ते साडेतीन तास…

एका आदिवासी पाड्यावर डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी गेले होते. तेथे नऊ महिन्यांची गर्भवती महिला आढळली. ती सातव्यांदा गर्भवती होती. नऊ महिन्यांत ती एकदाही रुग्णालयात तपासणीसाठी गेली नव्हती. वेदना होऊ लागल्यानंतरही ती रुग्णालयात जाण्यास तयार नव्हती. डॉक्टरांनी रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने साडेतीन तास समुपदेशन केल्यानंतर ती रुग्णालयात आली आणि दोन तासांनी तिने बाळाला जन्म दिला, असा अनुभव तेथील डॉक्टरांनी सांगितला.

Post a Comment

0 Comments