उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात संबंध काय?


मेहुण्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

उद्धव ठाकरे माहिती देणार की मी जाहीर करु, किरीट सोमय्यांचा इशारा

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली. या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आहे. उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यावर कारवाई झाल्याने सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार असल्याचा इशारा दिला आहे.


“श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीला पाठपुरावा करत आहे. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारामुळे त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता आहे. ईडीने एका व्यवहाराची माहिती दिली असून ३० कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. गेल्या ईडीला गेल्या दीड वर्षात कोट्यवधींची माहिती दिली आहे.सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे संबंध काय? अशी विचारणा यावेळी किरीट सोमय्यांनी केली. “नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? हे माझं वाक्य संपल्याबरोबर उद्धव ठाकरेंची माफिया सेना लगेच बोंबाबोंब सुरु करणार. याआधी मी असाच प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे आणि अन्व नाईकडे संबंध काय?,” असं सोमय्या म्हणाले.


“ठाकरे साहेबांनी त्यांचे आणि परिवाराचे आर्थिक व्यवहार, व्यवसायिक संबंध सांगितले तर किरीट सोमय्या, ईडी किंवा न्यायालयाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. १९ बंगले लपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. पण खरं बाहेर आलंच. २०१९ मध्ये रश्मी उद्धव ठाकरे बंगले माझे आहे सांगतात आणि २०२१ मध्ये उद्धव ठाकरे बंगलेच नाही सांगतात. पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यातील आर्थिक संबंध व्यवहारावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत का?.” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.


“मुख्यमंत्री परिवाराला माझी विनंती आहे की जे आर्थिक व्यवहार आहेत, शेल कंपन्यांकडून पैसे घेतले, मनी लाँड्रिंग केलं त्यासंबंधी तुम्ही माहिती देणार की मलाच द्यावी लागणार. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी २०१४ मध्ये कोमास प्रॉपर्टीज कंपनी जी बनवली होती. यामध्ये आदित्य ठाकरे मालक पण, संचालक पण, ५० टक्के त्यांचे आणि ५० टक्के रश्मी ठाकरेंचे…या कंपनीची आता नंदकिशोर चतुर्वैदीच्या मालकीची आहे. हा हवाला ऑपरेटर असून ३० कोटींच्या व्यवहारात त्यांचा समावेश आहे. ठाकरे परिवाराने जी कंपनी बनवली होती ती नंदकिशोर चतुर्वेदींना का दिली?,” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.


“जसा अन्वय नाईकचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर माफिया सेनेचे १२ नेते अंगावर आले होते. तीन वेळा हल्ला केला होता आता कुठे आहेत? पाच मिनिटानंतर हल्ला सुरु करणार. कारण नंदकिशोर हा हवाला ऑपरेटर आहे. त्यांची कंपनी ठाकरे कुटुंबाने तयार केली आहे. ती कंपनी कधी, कशी आणि का दिली? नंदकिशोर चतुर्वैदी आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध काय? ठाकरे परिवाराचा हा पहिलाच मनी लाँड्रिंग व्यवहार आहे का? यासंबंधी महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे,” असं सोमय्या म्हणाले.


मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर कारवाई ; ६ कोटी ४५ लाखांच्या मालमत्तेवर ‘ईडी’ची टाच

ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली़ या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आह़े.


पुष्पक बुलियन प्रकरणात ‘ईडी’ने ही कारवाई केली आह़े. याआधी ‘ईडी’ने ६ मार्च २०१७ रोजी पुष्पक बुलियन व समूह कंपन्यांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने पुष्पक बुलियनच्या २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीच्या मालमत्तांवर टांच आणली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीशी ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार झाल्याचे ‘ईडी’च्या निदर्शनास आले. त्यानंतर या कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेवर टांच आणण्यात आली.


पुष्पक समूह महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आहे. पुष्पक रियल्टीमध्ये गुंतवलेली रक्कम महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदीच्या माध्यमातून काढून घेतल्याचे या प्रकरणाच्या तपासादरम्यान उघडकीस आले. मेसर्स पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली २० कोटी दोन लाख रुपये नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना दिले. अनेक बनावट कंपन्या चालवणाऱ्या नंदकिशोर चतुर्वेदी यांनी पुढे मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीला ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम विनातारण (असुरक्षित) कर्जस्वरूपात दिली. अशा पद्धतीने गैरव्यवहारातील रकमेचा श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीच्या गृहप्रकल्पात वापर झाल्याचे ‘ईडी’कडून सांगण्यात आले.


पुष्पक बुलियन प्रकरण काय आहे?

नोटाबंदीच्या काळात २८५ किलो सोन्याची खरेदी केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०१७ मध्ये पुष्पक बुलियनविरोधात गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्स प्रा. लिमिटेड कंपनीचे चंद्रकांत पटेल यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ या नोटाबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी केले होते. त्याची किंमत ८४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. या प्रकरणाच्या तपासात पीहू गोल्ड आणि साटम ज्वेलर्स यांच्या खात्यामध्ये ४१ दिवसांत मोठय़ा प्रमाणात रक्कम जमा केल्याचे उघड झाले होते. पुष्पक बुलियन्सचे खाते बँकेने ‘नॉन प्रॉफिट असेट्स’ म्हणून जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर या खात्यातून व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या