बीडचं गोळीबार प्रकरण विधानसभेत तापलं


 राष्ट्रवादीच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर, गृहमंत्री म्हणाले...

  बीड : मागच्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. हत्या, बलात्कार, प्राणघातक हल्ले, गोळीबार त्यासोबतच वाळू माफियांच्या कारवाया आणि जिल्ह्यातील मशिद आणि देवस्थानच्या जमिनी बळकावल्याची अनेक प्रकरणं यांमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचा आरोप होत आहे. बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावर आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विधानसभेत लक्षवेधी तक्रार दाखल केली. यासंदर्भात आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची दखल घेत. बीडमध्ये जे गुन्हे वाढले आहेत, त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून 15 दिवसांत कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे. 

आज अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार होत आहे. एका वर्षांत दुप्पट गुन्हे दाखल झाले आहेत. यावर पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री यांना पत्र पाठवून बैठक मागीतली होती. यांच्याकडे या पिस्तुल आलं कुठून? नेटफिलिक्सवरील एका सिरीजमधील पिस्तुलासारखा व्यवहार दिसतोय. यात सत्ताधारी पक्षाचे नेतेही आहेत."

तक्रारदार राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके बोलताना म्हणाले की, "या घटनेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यात यावेत. ही एकच घडना नाही. तर जुगार आणि इतर धंदे सुरु आहेत. पोलीस हप्ते घेत आहेत. पोलीस भरतीत घोटाळा झालेला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली झाली पाहिजे. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे." 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलताना म्हणाले की, "कुटुंबातील ही वडिलोपार्जित जमिनीचा प्रश्न होता. एकानं ती जमीन विकण्याचा प्रयत्न केला. म्हणून दुसऱ्याने गोळीबार केलाय. ज्यानं गोळीबार केला आणि ज्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. या दोनही बाजूंवर गुन्हे दाखल केले आहेत. या संदर्भात तेथील लोकप्रतिनिधी यांच्याशी बैठक घेतली जाईल. तसेच, बीडमध्ये जे गुन्हे वाढले आहेत त्यांची वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून 15 दिवसांत कारवाई केली जाईल"

काय आहे प्रकरण? 

बीड जिल्ह्यातील या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहून लक्ष वेधले होते. पंकजा मुंडे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुद्धा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात तक्रारी करत  आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आमदार संदीप क्षीरसागर व आमदार बाळासाहेब आजबे या तीन आमदारानी बीड जिल्ह्यातल्या कायदा-सुव्यवस्थेचा संदर्भात विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी तक्रार दाखल केली आहे. 

विरोधी पक्षांनी जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची तक्रार करणे स्वाभाविक असले तरी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनीच लक्षवेधी मांडत आहेत. सत्ताधारी पक्षांकडून जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या तक्रारी करत आहेत, तर मग जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे राखायची कोणी? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या