‘जनाब बाळासाहेबांच्या उल्लेखाला शिवसेनेकडून ‘मियाँ देवेंद्र’ चे उत्तर; शिवसंपर्क मोहिमेस औरंगाबादमध्ये सुरुवात


‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या उल्लेखाचा धिक्कार करत आहे.

औरंगाबाद : ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या उल्लेखाचा धिक्कार करत आहे. फडणवीस यांचा उल्लेख आता मियाँ देवेंद्र असा करण्याची वेळ आली आहे. कारण ‘एमआयएम’ ने दिलेला प्रस्ताव हा भाजपचेच कपट कारस्थान असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. औरंगाबाद येथे ते शिवसंपर्क मोहिमेसाठी मंगळवारी आले होते.


 ‘आमचे हिंदूुत्व शेंडी- जानव्यांचे नसून ते व्यापक आहे. त्यात भारतातील हिंदूुस्थानी मुस्लिमांसह अन्य धर्मीय हेही त्यात येतात असे सांगत विनायक राऊत यांनी भाजपचीच एमआयएमबरोबर युती आहे. उत्तर प्रदेशात त्यांच्या गाडीच्या टायरवर गोळी लागणे, तो हल्ला करणारे चार दिवसात पकडणे हा त्याच षडयंत्राचा भाग होता. त्यामुळे भाजप हीच एमआयएमची बी टीम आहे. एमआयएमने त्यांच्याबरोबर जरुर रहावे, पण शिवसेनेशी आगळीक करू नये, असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला. पत्रकार बैठकीत फडणवीस यांचे इफ्तार पार्टीतील छायाचित्रही शिवसेनेकडून माध्यमांपर्यंत देण्यात आले. जनाब असा शब्द हिंदू हृदयसम्राट यांना लावणे चुकीचे आहे.

जनाब हा शब्द चुकीचा आहे काय, असे राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, ‘तो शब्द बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे लावणे चुकीचे आहे. असा शब्द फडणवीस यांनी वापरणे म्हणजे भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या बाळासाहेबांविषयी असणाऱ्या विचारांची प्रतारणा आहे. जनाब असे संबोधून देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू हृदयसम्राटांची अवमानना केली आहे.’ या पत्रकार बैठकीस संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडले, लक्ष्मण वडले यांची उपस्थिती होती. राज्यातील १९ जिल्हामध्ये शिवसेनेचे खासदार शिवसंपर्क मोहीम राबवत असून औरंगबाद जिल्ह्यात १५८  ठिकाणी ही संपर्क मोहीम होईल असे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे म्हणाले.


दानवे जनाब

जनाब हा शब्द वापरायचाच असेल तर भाजपच्या नेत्यांनी लावावा आपल्या नावामागे. जनाब देवेंद्र फडणवीस, जनाब दानवे असे पत्रकार बैठकीत विनायक राऊत म्हणाले. शेजारीच असणाऱ्या अंबादास दानवे यांनी त्यात लगेच सुधारणा करत जनाब रावसाहेब दानवे असा बदल केला आणि पत्रकार बैठकीत हशा पिकला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या