“काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी, कोणत्याही भीतीविना…”


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला असून चौकशी सुरू करून खंडण्या वसूल करायच्या हा सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांचा उद्योगच झाला असल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी ‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशीन झाली आहे, असा आरोप करत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील लवकरच तुरुंगात जातील, असा इशारा दिला.

‘ईडी म्हणजे भाजपचे एटीएम’

‘ईडी’चे अधिकारी खंडणीतून वसूल होणारी रक्कम जितेंद्र नवलानी याच्या सात कंपन्यांच्या खात्यांमध्ये जमा करत होते. या खंडणीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वसुली ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईत केली आहे. यासंदर्भात ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. ‘ईडी’चे अधिकारी नक्कीच तुरुंगात जातील, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’चा दबाव; शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे व्यंकय्या नायडूंना पत्र


दरम्यान संजय राऊतांनी फेब्रुवारी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी संजय राऊतांना काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. पत्रात राहुल गांधी यांनी संजय राऊतांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना ८ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राची दखल घेतली आहे.

तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट केलं जात असल्याचा मी निषेध करत असून तुमच्या पत्रातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा झाला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून कोणतीही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहोत असं राहुल गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.


राहुल गांधी यांनी लिहिलेलं पत्र संजय राऊत यांनी ट्वीटरला शेअर केलं असून त्यांचे आभार मानले आहेत. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी त्या पत्रात काय म्हटलं होतं?

पैशाची अफरातफरी केल्याच्या आरोपाखाली माझ्यासह राज्यातील दोन कॅबिनेट मंत्री, दोन ज्येष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल. महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांना तुरुंगात टाकू आणि राज्यात विधानसभेची निवडणूक घेऊ, अशी धमकी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या पत्रात केला होता.


राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर सातत्याने दबाव आणला जात असून काही जण मला भेटायलाही आले होते. मी त्यांची मागणी धुडकावली. मला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. तुरुंगात गेलेल्या माजी रेल्वेमंत्र्यांसारखे मलाही तुरुंगात खितपत पडावे लागेल, अशी धमकी त्यांनी दिली, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार, नेते, माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र यांच्या मागे ‘ईडी’ने चौकशीचा ससेमिरा लावला असून त्यांचा छळ केला जात आहे. जमिनीच्या व्यवहाराबद्दल चौकशी करण्याचा ‘ईडी’ला अधिकार नाही. माझ्या मुलीच्या लग्नसमारंभाच्या आयोजनातील कंत्राटदारालाही त्रास दिला जात आहे. पण मी या धमक्यांना घाबरत नाही, मी यापुढेही सत्य उघड करेन, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या