अहमदनगर :नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका केंद्रावर बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची माहिती आहे. यासंबंधी चौकशी सुरू असून लवकरच नेमके काय ते स्पष्ट होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. पेपर सुरू झाल्यानंतर व्हॉटसॅपवर प्रश्नपत्रिका आणि उतरे लिहिलेला मजकूर व्हायरल झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून याची चौकशी सुरू असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले.
आज बारावीचा गणिताचा पेपर होता. व्हॉटसॅपवर गणिताची प्रश्नपत्रिका उत्तरांसह व्हायरल झाली. त्यामुळे पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली. यासंबंधी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले की, ‘श्रीगोंद्यात हा पेपर सुरू झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने अशी प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची माहिती मिळाली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडून यासंबंधी शिक्षण विभागाकडे विचारणा झाल्यावर आम्ही चौकशी सुरू केली आहे. पेपर सुरू झाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे दिसते. तरीही हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे हे कसे आणि नेमके कोठून घडले, याची चौकशी करण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवून पुढील कार्यवाहीसंबंधी मार्गदर्शन मिळविण्यात येणार आहे. या दरम्यान, जिल्ह्यातील सर्व केंद्रावर बारावीचा पेपर सुरळीत सुरू आहे,’ असेही कडूस यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी बारावीचा रसायनशास्त्र विभागाचा पेपर फुटल्याची चर्चा होती. मात्र, खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच स्पष्टीकरण देत रसायनशास्त्राचा पेपर फुटला नसल्याचे सांगितले आहे.
0 टिप्पण्या