महापालिकेतील विद्यार्थी शिक्षणात अधिक माघारले


८१ टक्के मुलांना उतारा वाचनात गती नसल्याचे निष्कर्ष

कोविड काळात बंद असणाऱ्या शाळा, ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधांची कमतरता यामुळे महापालिकेतील शाळांमधील अध्ययन आशय गळती कमालीची वाढली.

औरंगाबाद : कोविड काळात बंद असणाऱ्या शाळा, ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधांची कमतरता यामुळे महापालिकेतील शाळांमधील अध्ययन आशय गळती कमालीची वाढली. महापालिकेतील केवळ १८.७३ टक्केच मुलांना भाषा स्तरावरील वाचन केलेला उतारा समजतो. म्हणजे ८१ टक्के मुलांना वाचलेले उमगत नाही. तर मुळाक्षरे माहीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ १६.१८ टक्केच असल्याचे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात आलेल्या अध्ययन स्तर पाहणीतून समोर आले आहे. शहरातील विद्यार्थ्यांना भाषा व गणित विषयातील काही जण अक्षरश: अडाणी असल्याचे निष्कर्ष निघाल्यानंतर आता प्रशासन नव्याने उपचारात्मक वर्ग घेण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेणार आहे.

औरंगाबाद शहराची दोन साधन केंद्रात विभागणी करण्यात येते. शहरातील ७८ शाळांमधील अध्ययनाचा स्तर कमालीचा घसरलेला आहे. ग्रामीण भागातील शाळांपेक्षाही तो खूपच कमी असल्याचे नुकतेच पाहणी करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांनाही सांगितले. अध्ययन स्तराचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुळाक्षरे, शब्द, वाक्य व उतारा वाचता येतो का व त्याची समज आहे काय, याची तपासणी करण्यात आली होती. ही पाहणी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची करण्यात आली होती. औरंगाबाद शहरातील दोन साधन केंद्रातील ९७७२ विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर पाहणीतील हे निष्कर्ष चिंताजनक असल्याने स्मार्ट शाळांच्या उपक्रमास खूप अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांना विचारले असता ते म्हणाले की, शाळा बंद असल्याने अध्ययन गळती होणे स्वाभाविक होते. आता शिक्षकांना पुन्हा प्रशिक्षण देऊन यावर उपाय केले जातील. दरम्यान अध्ययन गळती व शाळांमधील शिक्षणाचा दर्जा याबाबत विद्या प्राधिकरणाचे संचालक कलिमोद्दीन शेख यांनी महापालिका आयुक्तांची नुकतीच भेट घेऊन भाषा व गणित विषयातील मागे पडलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीबाबत त्यांना नुकतेच अवगत केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या