विलगीकरण केंद्रातील साहित्य गायब


 उपायुक्तांमार्फत चौकशी करण्याचे प्रशासकांचे आदेश

करोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या २५ पेक्षा जास्त केंद्रांतील पलंग, गाद्या, त्यावरील चादरी आदी दैनंदिन वापराच्या लाखो रुपयांच्या वस्तू गायब झाल्या आहेत.

औरंगाबाद : करोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या २५ पेक्षा जास्त केंद्रांतील पलंग, गाद्या, त्यावरील चादरी आदी दैनंदिन वापराच्या लाखो रुपयांच्या वस्तू गायब झाल्या आहेत. या प्रकाराची उपायुक्तांमार्फत चौकशी  करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी बजावले आहेत.


गायब झालेले साहित्य परत घेण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी असे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनाही सांगण्यात आले आहे. पहिल्या लाटेत २२, तर दुसऱ्या लाटेत २५ विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती. या केंद्रामध्ये चांगल्या सुविधा देण्यात आल्या होत्या. विरंगुळा म्हणून लागणाऱ्या साहित्यापासून ते पंखे, टीव्ही,खेळाचे साहित्य तेथे होते. मात्र आता हे सारे साहित्य गायब झाले आहे.  दरम्यान, तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमीच राहिली. त्यामुळे पुन्हा विलगीकरण कक्ष सुरू करण्याची गरज पडली नाही. मात्र पालिकेने सर्व तयारी करून ठेवली होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरात करोनाचे रुग्णच नसल्याने विलगीकरण सेंटर्स ओस पडले आहेत. त्याचा गैरफायदा घेत सेंटर्समधील सर्व साहित्य लंपास झाल्याचे पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीतून समोर आले. त्यावर प्रशासकांना धक्काच बसला. त्यांनी सर्व साहित्याची  वसुली करण्याचे करण्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिले.  तसेच साहित्याची वसुली झाली नाही तर त्यांची जबाबदारीही आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याचीच राहील, असेही बजावले.

उपायुक्त करणार चौकशी

साहित्य गायब प्रकरणाची पालिका उपायुक्तांकडून चौकशी करण्याचे आदेशही प्रशासकांनी दिले. हे साहित्य ज्यांच्या ताब्यात होते त्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची आता चौकशी होणार आहे. डॉ. मंडलेचा यांना यापूर्वी पत्रकारांनी अनेकदा करोना काळातील साहित्याचे काय झाले, असा प्रश्न केला होता. तेव्हा त्यांनी यावर बोलण्याचे टाळले. गुरुवारी बैठकीत मात्र प्रशासकांनी विचारणा करताच साहित्यच गायब झाल्याचे वृत्त समोर आले. पहिल्या लाटेतही साहित्य गायब झाले होते. त्यावर कारवाई न झाल्याने हा प्रकार पुन्हा घडल्याचे सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या