इसाक बागवान प्रकरणावरून राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप


म्हणाले, “दाऊदने यांना सुपारी दिलीये आणि हे अल-कायदाचा…”!

संजय राऊत म्हणतात, “काही राजकीय लोकांना सुपारी द्यायची आणि देशाच्या व्यवस्थेला सुरुंग लावायचे हा अल कायदाचा अजेंडा होता. तोच हे लोक राबवतायतय”

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर नवा पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला. मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करतानाच त्याचा पुरावा म्हणून फडणवीसांनी इसाक बागवान यांचे बंधू नासीर बागवान यांचं एक स्टिंग ऑपरेशन पेनड्राईव्हमध्ये असल्याचा दावा केला. यावरून राज्यात खळबळ उडाली असतानाच शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर आणि फडणवीसांवरच उलट आरोप केला आहे.

“लोकांच्या घरात शिरू नका, तुम्हालाही..”

संजय राऊतांनी यावेळी भाजपाला इशारा दिला. “इसाक बागवान यांना महाराष्ट्र ओळखतो. तुम्ही कुणावरही काहीही आरोप करून पोलीस दलाचं मनोबल खच्ची करू नका. लोकांच्या घरात शिरू नका. तुम्हालाही घरं आहेत. बागवान यांच्याविषयी मी अनेकदा लिखाण केलं आहे. अनेकांनी केलं आहे. त्यांचं पुस्तक आलं आहे. २६\११ च्या हल्ल्यात त्यांनी जिवाची बाजी लावून इस्त्रायली मुलाचा जीव वाचवला. त्यासाठी इस्त्रायलच्या सरकारने देखील त्यांचं कौतुक केलं आहे”, असं राऊत म्हणाले.

“अल-कायदाचाही हाच अजेंडा होता”

दरम्यान, संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना भाजपा अल कायदाचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप केला. “तुम्ही आमच्याच अधिकाऱ्यांचं, प्रशासनाचं ज्या प्रकारे खच्चीकरण करताय, मला वाटतं यांना दाऊदने सुपारी दिली आहे, पाकिस्तानने सुपारी दिली आहे की हे सगळं खच्चीकरण करा. अल कायदाचा अजेंडाच हा होता. काही राजकीय लोकांना हाताशी धरायचं, त्यांना सुपारी द्यायची आणि देशाचं, राज्याचं प्रशासन, व्यवस्था याला सुरुंग लावायचा हा अल कायदाचा अजेंडा होता. तोच हे लोक राबवतायत असं मला दिसतंय”, असा आरोप राऊतांनी केला आहे.

“आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन!”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी फडणवीसांवर पेनड्राईव्हवरून देखील निशाणा साधला. “नागपूर दौऱ्यानंतरच पेनड्राईव्ह बाळंत झाले आहेत. तिथे आम्हाला मिळालेल्या प्रतिसादानंतर धाडी, पेनड्राईव्ह, बाळंतपणं सुरू झाले आहेत. हरकत नाही. पोट दाबत बसा”, असं राऊत म्हणाले आहेत. तसेच, “यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? बघावं लागेल. आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन…” असा इशारा देखील राऊतांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या