MIM कडून 'मविआ'ला ऑफर; इम्तियाज जलील आणि राजेश टोपेंमध्ये नेमकी काय झाली चर्चा? टोपेंनीच दिलं उत्तर


औरंगाबाद :
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सोबत येण्याची ऑफर दिली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा करताना इम्तियाज जलील यांनी ही ऑफर दिली होती. या ऑफरवरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण इम्तियाज जलील आणि राजेश टोपे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.


इम्तियाज जलील आणि राजेश टोपेंमध्ये काय झाली चर्चा ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आमच्यात झालेल्या त्या फक्त अनौपचारिक गप्पा होत्या. उत्तरप्रदेश निवडणुकीच्या संदर्भातील गप्पा होत्या काही इतर विषयांवर चर्चा झाली. या सर्वांच्या माध्यमातून मी म्हटलं, उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत एमआयएममुळे काही 10-15 सीट्स पडल्या असा आमचा अभ्यास आहे. म्हटलं अजून 10-15 सीट्स वाढल्या असत्या. तुम्ही असं का करता की, ज्यामुळे जातीयवादी पक्षांना मदत होईल असं का वागता, काय धोरण आहे. त्यावर ते म्हणाले, अल्पसंख्यांक समाजाचा विकास व्हावा अशी आमची धारणा आहे. ज्या कुठल्या पक्षाकडून अल्पसंख्यांकाच्या विकासाच्या संदर्भात निर्णय होत असेल तर आम्ही करू. मी त्यांना म्हटलं, अल्पसंख्यांकांना सोबत घेऊनच काम करत आलो आहोत. विशेष एक विभाग करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही आग्रही असून प्रश्न सोडवत असतो. ते म्हणाले असे आमचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षासोबत आम्ही कधीही येऊ शकतो. यावर मी म्हटलं, तुमचं जे काही म्हणणं असेल ते महाविकास आघाडीच्या नेत्रृत्वाला बोला.

मला असं वाटतं की, याबाबत ज्या काही गोष्टी असतात त्याबाबत पक्षश्रेष्ठीच ठरवतात. आम्ही सहकारी कार्यकर्ते आहोत आम्हाला त्याबाबतचा अधिकार नसतो. शरद पवारांना निरोप देणार का? यावर राजेश टोपे म्हणाले, आमच्या अनौपचारिक चर्चा होत्या. मला वाटतं की, या निरोपाच्या गोष्टी नाहीयेत. या संदर्भात पक्षश्रेष्ठीच ठरवतील मला याबाबत बोलण्याचा कुठलाही अधिकार नाहीये असंही राजेश टोपे म्हणाले.

मला असं म्हणायचं आहे की, जे काही एमआयएमला बोलायचं असेल ते त्यांनी आमच्या पक्षश्रेष्ठींसोबत बोलावं. जयंत पाटील, अजित पवार, शरद पवार यांच्यासोबत त्यांनी बोलावं आणि ते जे काही निर्णय घेतील ते मान्य असतील असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या