औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणाऱ्यांसोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा; उद्धव ठाकरे MIM बद्दल स्पष्टच बोलले


औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेवणाऱ्या एमआयएमशी युती अशक्य – उद्धव ठाकरे

एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा विषय काढला, पण हा भाजपचाच कट आहे. औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या ‘एमआयएम’शी युती कदापि शक्य नाही, असं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान मंगळवारपासून सुरू होत असून, त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे खासदार व संपर्कप्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधला. या अभियानात शिवसेनेचे खासदार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी गावपातळीवर जाऊन महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. याबाबत पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपवर घणाघाती टीका केली.


एमआयएमवर भूमिका केली स्पष्ट

“शिवसेनेला जनाबसेना म्हटलं जात आहे. आपण हिंदुत्व सोडलेलं नाही. आत डाव पहा…काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का? हाच खऱा डाव आहे. एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. आम्ही भाजपासारखं सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणं शक्य नाही,” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

“अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.


“झोपेतही एमआयएमसोबत युती करणार नाही. ही भाजपाकडूनच ऑफर आल्याची १०० टक्के खात्री आहे. एमआयएम भाजपाची बी टीम असल्याची खात्री झाली आहे. धोका आहे त्यांना बदनाम आणि नामशेष करणं ही त्यामागची चाल आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.


शरद पवारांची प्रतिक्रिया

रविवारी सायंकाळी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना एमआयएमसोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावली. एमआयएमकडून आलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी, “कोणी कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात. मात्र ज्यांच्यासोबत जायचे आहे, त्या पक्षांनी तर प्रस्तावावर होय म्हटले पाहिजे. हा एक राजकीय निर्णय आहे. हा प्रस्ताव महाराष्ट्रापुरता केला असल्यास तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशाप्रकारच्या राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला देत नाही. राज्यामध्ये अशाप्रकारचा निर्णय आपण घेऊ शकतो हे जोपर्यंत पक्षाची राष्ट्रीय समितीन स्पष्ट करत नाही तोपर्यंत अशाप्रकारची भूमिका घेता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही”.


इम्तियाज जलीलबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील – दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येवला येथे प्रसारमाध्यमांनी संवाद साधताना “एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या