पुण्यातील पाणी प्रश्न पेटला : गिरीश बापटांच्या राजीनाम्याची मागणी करत NCP चं आंदोलन


पुण्याच्या पाणी प्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे.

पुणे : शहरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तसेच खासदार गिरीश बापट यांनी महापालिका आयुक्तांच्या घरी जाऊन पाण्याचा प्रेशर चेक केलं होतं. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आज राष्ट्रवादीने गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘पुणे महापालिकेवर प्रशासक नेमल्यानंतर गिरीश बापट यांनी महापालिका आयुक्तांच्या घरी का भेट दिली. ज्यावेळी महापालिकेत भाजपाची सत्ता होती तेव्हा ते का गेले नाहीत?’, ‘अहो बापट करू नाटक’, ‘पुणेकर नागरिकांची फसवणूक करणार्‍या गिरीश बापट राजीनामा द्या’, अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आल्या.

“शहरातील अनेक भागात सध्या पाणी पुरवठा विस्कळित आहे. त्यावर भाजपeचे खासदार गिरीश बापट चार दिवसापूर्वी महापालिका आयुक्तांच्या घरी जाऊन पाण्याचा प्रेशर चेक केला. ज्यावेळी पुणे महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांना हे अचानक का आठवले? नगरसेवक, आमदार, पालकमंत्री आणि खासदार अशा अनेक पदावर काम करणार्‍या नेत्यांनी पुणेकर नागरिकांची दिशाभूल यात केली आहे,” असा आरोप जगताप यांनी केलीय.

“तुम्ही २४ तास पाणी देणार होतात ते कुठे गेले? बापट नाटक करु नका. या फसवणुकीसाठी तुम्ही राजीनामा द्यायला हवा,” असंही जगताप म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या