प्रत्येक तालुक्यात मेडिकल कँपचे आयोजन होणार, एनएचएम अंतर्गत औरंगाबादला 1 कोटीचा निधी

 औरंगाबाद:
जिल्ह्यातील ग्रामीण भागात तालुकास्तरीय आरोग्य कँप घेण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता लवकरच औरंगाबाद जिल्ह्यातील  ग्रामीण भागात नागरिकांसाठी आरोग्य कँप  आयोजित केले जाणार आहेत. खेडे गावांतील सर्वसामान्य नागरिकांची या कँपमधील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत  आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार, रक्त चाचण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती खा. इम्तियाज जलील यांनी दिली. चालू एप्रिल महिन्यातच असे आरोग्यविषयक कँप घेतले जातील, असेही खासदारांनी सांगितले.

आरोग्य कँपचे स्वरुप कसे असेल?

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाअंतर्गत उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली एप्रिल महिन्यातच तालुकास्तरावर हे आरोग्य कँप आयोजित केले जाणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. तसेच या कँपच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हाधाकारी सुनील चव्हाण यांच्यावर असेल. त्यासाठी तालुकास्तरीय समिती नियुक्त करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार, विविध सोयी सुविधा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे. आरोग्य शिक्षणाचे महत्त्व आणि आरोग्याच्या योजनांचा व्यापक स्वरुपात लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील इतर शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था आणि कॉर्पोरेट देणगीदार यांचासुद्धा सहभाग केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे होणार आहे.

कुटुंब नियोजनाची जनजागृतीही होणार

ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी होणाऱ्या या कँपमध्ये शल्यचिकित्सक, बालरोग तज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ, प्रसूती व स्त्री रोग तज्ञ, दंत चिकित्सक व बाधिकरण तज्ञ येणाऱ्या रुग्णाची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देतील. तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमासह विविध आरोग्य योजनांची जनजागृतीही केली जाणार आहे. उदा. आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स व PM-JAY योजना, उपस्थितांसाठी ABDM अंतर्गत युनिक हेल्थ आयडी कार्ड तयार करण्याची सुविधा असणार, पात्र नागरिकांसाठी AB-PM-JAY अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल,


शहरात घरोघरी जाऊन कोरोना लसीकरण

दरम्यान, औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. रमजानचा महिना सुरु असल्याने शहरातील दोन दुकानात रात्रीच्या वेळीही लसीकरणाची सुविध मनपा उपलब्ध करणार आहे. पैठण गेट येथील फॅशन बाजार व सिटी चौक येथील सामी कटपीस सेंटर अशा दोन ठिकाणी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल. दुसरा डोस बाकी असणाऱ्या नागरिकांची यादी रोग्य केंद्र निहाय वैद्यकीय अधिकऱ्यांना देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रवर न येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस दिली जाणार असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या