सोमय्यांची पाठराखण केल्याने संजय राऊत फडणवीसांवर संतापले; म्हणाले “स्वर्गात बाळासाहेब, हेगडेवार…”

 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आयएनस विक्रांतमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांची पाठराखण केल्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ईडी जर भाजपाची बटीक नसेल तर याप्रकरणी कारवाई करावी असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं असून हा मनी लाँड्रिंगचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हा मुद्दा आज राज्यसभेतही उपस्थित केला जाणार आहे.


“आयएनएस विक्रांतच्या संदर्भात देशभावना, लोकभावना यांच्याशी खेळ करुन, बलिदानाचा आणि मातृभूमीचा लिलाव करुन बाजार मांडणारे भाजपाचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्यांचे महापुत्र नील सोमय्या यांच्या राष्ट्रद्रोही भ्रष्टाचाराचं प्रकरण मी बाहेर काढलं. इतकं होऊनही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आश्चर्य वाटतं. राष्ट्रभक्तीवर गाणी गातात, भाषणं देतात. दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती, हिंदुत्व शिकवतात…पण काल ज्या पद्धतीने राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची वकिली करण्याचा प्रयत्न केला ते पाहून स्वर्गात गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, हेगडेवार आणि आजचे मोहन भागवत यांचा जीव तीळतीळ तुटला असेल. अटलजी वैगेरे तर सोडून द्या,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

“तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा माणूस ज्याने देशाची महान युद्धनौका, ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची फाळणी होऊ शकली त्याचा लिलाव मांडला. त्याच्यातून काही कोटी रुपये त्यांनी आणि त्यांच्या मुलाने गोळा गेले, घोटाळा केला. याचे पुरावे समोर आले तरी पुरावे कुठे आहेत म्हणता?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली.


“काल ते म्हणाले की आम्हाला नखं कापून शहीद होण्याची सवय आहे. तुम्ही काय उपटलं ते सांगा. तुमचं या देशासाठी काय योगदान आहे. उलट ज्यांचं बलिदान आहे त्या बलिदानाचा लिलाव करुन पैसे गोळा करत आहात. कधी राम मंदिराच्या नावे, कधी गंगाजल विकून पैसे गोळा केलेत. महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान असून त्यातून पैसे गोळा केला. आणि त्या भयंकर अशा भ्रष्ट गुन्हेगाराची बाजून घेऊन त्याची वकिली करता,” अशी टीका संजय राऊतांनी केली.


पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी अभ्यासाशिवाय, पुराव्याशिवाय बोलत नाही म्हणता. मग काय पुरावा आहे तुमच्याकडे? राजभवन तुमचंच असून त्यांनीच पुरावा दिला आहे”. शिवसेनेतर्फे आज राज्यसभा आणि लोकसभेत स्थगन प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती यावेळी संजय राऊतांनी दिली.


“आज महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर आंदोलन होणार आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशद्रोही लोकांना तुरुंगात टाकू. देशभक्तीचे. हिंदुत्वाचे मुखवटे लावून लोकांना मूर्ख बनवण्याचे जे उद्योग चालवल आहेत ते गळून पडले आहोत. भविष्यात मी अजून काही विषय मांडणार आहे,” असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला.


आयएनस विक्रांत जरी या लोकांनी भंगारात घालवली असली तरी त्या अरबी समुद्रात विक्रांतच्या नावे भ्रष्टाचार करणारे हे फालतू पुढारी आणि त्यांचे पक्ष बुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,” असंही ते म्हणाले.


“आमच्यावर पाठीमागून कितीही वार केले, खंजीर खुपसला तरी शिवसेनेचं मनोबल खचलेलं नाही. भाजपाचे भ्रष्ट्राचारी जातील तिथे जोडे मारल्याशिवाय लोक राहणार नाहीत. महाराष्ट्र सर्व काही खपवून घेईल, पण देशाचं रक्षण करणं हा महाराष्ट्राचा पीडिजात धंदा, वारसा आहे. देशाच्या संरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात कोणी गद्दार असेल तर त्याला याच मातीत गाडल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही,” असंही ते म्हणाले,


“भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. देशभरातून पैसे गोळा करण्यात आले असून हा आकडा मोठा असू शकतो. मी फक्त राज्यातील आकडा आहे. है पैसे सोमय्यांनी निवडणुकीत वापरले आहेत. पीएमसी बँकेच्या माध्यमातून पैसे चलनात आणले आणि नील सोमय्याच्या व्यवसायात वापरण्यात आले,” असा आरोप संजय राऊतांनी केला.


“७११ मोठे बॉक्स पैसे गोळा करण्यासाठी वापरण्यात आले. मुंलुंडच्या कार्यालयात हे बॉक्स ठेवण्यात आले. काही बॉक्स फोडण्यात आले. त्या पैशांची बंडलं बांधण्यासाठी कार्यकर्ते बोलवण्यात आले. ते पैसे पीएमसी बँकेतून पैसे वळवण्यात आले. काही बॉक्स हे सोमय्यांच्या बिल्डर मित्राच्या कार्यालायत ठेवण्यात आले. हा मनी लाँड्रिंगचा प्रकार होऊ शकतो. पीएमएलए कायदा लागू शकतो. ईडी नावाची संस्था भाजपाची बटीक नसेल तर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही,” असंही राऊत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या