पुणे : राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सक्रिय असली, तरी गुरुवारपासून (२१ एप्रिल) तीन दिवस राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि अकोला या शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. या हंगामातील ही सर्वोच्च तापमानाची नोंद आहे. सध्या राज्याच्या सर्वच भागात सरासरी कमाल तापमानात दोन ते चार अंशापर्यंत वाढ झाली आहे.
बंगालचा उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडू आणि पुढे दक्षिण पश्चिम गुजरातपर्यंत चक्रीय स्थिती आहे. याचबरोबरच अरबी समुद्राच्या भागात देखील चक्रीय स्थिती वाढली आहे. या दोन्हीच्या परिणामामुळे २१ आणि २२ एप्रिल रोजी राज्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, हरियाणा, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेचे प्रमाण जोरदार वाढले आहे. या भागात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे.
काही भागात तर सरासरी तापमानात दोन ते चार अंशांपर्यंत वाढ झाली आहे. या भागाकडून राज्याकडे उष्णवारे वाहत आहेत. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. विशेषत: विदर्भातील सर्वच चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या शहरांचे तापमान ४४.८ अंशांवर पोहोचले आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा चार अंशांपर्यंत तापमानात वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या शहरांमधील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये
पुणे ३७.७, नगर ४२.९, जळगाव ४३.५, महाबळेश्वर ३०.६, नाशिक ३८.१, सोलापूर ४१.४, रत्नागिरी ३३.९, औरंगाबाद ४०.९, परभणी ४३.३, अमरावती ४३.४, नागपूर ४३.६
0 टिप्पण्या