पीटीआय, मुंबई : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच दिल्लीचे साहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ‘आयपीएल’च्या सामन्यात दिल्लीने राजस्थानकडून १५ धावांनी पराभव पत्करला. या सामन्याच्या अखेरच्या षटकातील पंचांच्या नो-बॉलच्या निर्णयावर पंत आणि शार्दूल यांनी प्रश्न उपस्थित केले, तर पंचांशी हुज्जत घालण्यासाठी अमरे थेट मैदानात गेले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
पंतने ‘आयपीएल’च्या आचारसंहितेतील कलम २.७चे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्याकडून सामन्याचे संपूर्ण मानधन दंडाच्या स्वरूपात आकारले जाणार आहे. शार्दूलला सामन्याच्या मानधनातील ५० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने ‘आयपीएल’च्या आचारसंहितेतील कलम २.८चे उल्लंघन केले. तसेच कलम २.२चे उल्लंघन करणाऱ्या अमरे यांना सामन्याच्या मानधनातील १०० टक्के रकमेचा दंड करण्यात आला असून त्यांच्यावर एका सामन्याची बंदीही असेल. या तिघांनीही आपली चूक मान्य करताना दंड स्वीकारला आहे.
नक्की काय घडले?
राजस्थानने दिलेल्या २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला अखेरच्या षटकात विजयासाठी ३६ धावांची आवश्यकता होती. डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेड मकॉय टाकत असलेल्या या षटकातील पहिल्या तिन्ही चेंडूंवर दिल्लीचा फलंदाज रोव्हमन पॉवेलने षटकार मारले. यापैकी तिसरा चेंडू थेट पॉवेलच्या कमरेच्या वरच्या बाजूला आल्याने तो नो-बॉल ठरवण्याची कर्णधार पंतने सीमारेषेबाहेरून मागणी केली. शार्दूलनेही पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तसेच अमरे यांनी मैदानावरील पंचांना निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्याचीही खूण केली. मात्र, पंचांनी त्यांना दाद न दिल्याने पंतने पॉवेल आणि कुलदीप यादव या आपल्या फलंदाजांना मैदानाबाहेर येण्यास सांगितले. तसेच पंचांशी संवाद साधण्यासाठी अमरे थेट मैदानात गेले. राजस्थानचे खेळाडू यजुर्वेद्र चहल आणि जोस बटलर यांनी दिल्लीच्या खेळाडूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर हा वाद थांबला आणि सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, दिल्लीला अखेरच्या तीन चेंडूंवर दोन धावाच करता आल्या.
तिसऱ्या पंचांचा हस्तक्षेप गरजेचा -पंत
चेंडू थेट पॉवेलच्या कमरेच्या वरच्या बाजूला आला. त्यामुळे मैदानातील पंचांनी तो चेंडू नो-बॉल ठरवला पाहिजे होता. किमान तिसऱ्या पंचांनी तरी हस्तक्षेप करून तो नो-बॉल आहे की नाही, हे पडताळून पाहणे गरजेचे होते, असे मत सामन्यानंतर पंतने व्यक्त केले. ‘‘तो नो-बॉल आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला असता. तिसऱ्या पंचांनी हस्तक्षेप करून नो-बॉल देणे गरजेचे होते. आम्ही खूप निराश आहोत. आम्हालाच काय, तर मैदानातील प्रत्येकाला तो नो-बॉल असल्याचे स्पष्टपणे दिसले. आमच्या वागणुकीचे मी समर्थन करणार नाही; पण आमच्यासोबत जे घडले तेही योग्य नव्हते,’’ असे पंत म्हणाला.
अखेरच्या षटकात आमच्याकडून जो प्रकार घडला, तो निंदनीय होता. दिल्ली कॅपिटल्स म्हणून आम्हाला तो शोभनीय नव्हता. पंचांचा निर्णय चूक असो अथवा बरोबर, तुम्ही तो स्वीकारला पाहिजे. पंचांशी हुज्जत घालण्यासाठी थेट मैदानात जाणे योग्य नाही.
0 टिप्पण्या