शिवसैनिकांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं; जुना फोटो लावत शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी


 मुंबई
:मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात आणि नंतर ठाण्यात झालेल्या 'उत्तर' सभेत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज ठाकरे यांच्यावर भूमिका बदलल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी केली आहे.

शिवसेना भवनासमोर एक पोस्टर लावण्यात आलं असून त्यामध्ये काल, आज आणि उद्या असं म्हणत मनसेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सुरुवातीला राज ठाकरे यांचा मुस्लीम समाजबांधवाच्या वेशातील एक जुना फोटो लावण्यात आला आहे, तसंच मध्यभागी 'हनुमान' असं लिहिलं आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह देत उद्या राज ठाकरे पुन्हा भूमिका बदलणार का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

मनसे विरुद्ध शिवसेना संघर्ष वाढणार

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करत आगामी काळात आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. तसंच शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. त्यातच आता शिवसैनिकांनी पोस्टरबाजी करत पुन्हा राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मनसेकडून या टीकेला कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.


दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही जवळ आली आहे. त्यामुळे शहरात शिवसेना आणि मनसे विविध मुद्द्यांवरून आमने-सामने येण्याची शक्यता असून यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या