औरंगाबाद : भोग्यांचा विषय चर्चेत आणून ध्रुवीकरणाचा मनसेकडून केला जाणारा प्रयोग पथ्यावर पडावा अशी भाजप कार्यकर्ते व हितचिंतकांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाला विचार व्यक्त करण्याची परवानगी मिळायला हवी अशी भूमिका भाजपकडून घेतली जात आहे. मनसेच्या सभेवर व भोंग्यांबाबत एमआयएमकडूनही प्रतिक्रिया आलेली नाही. तर होणाऱ्या ध्रुवीकरणानंतर शिवसेनेतील नाराजांना गळाशी लावले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण प्रभाग रचना हा नाराजीवरचा इलाज असू शकेल असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी बाळा नांदगावकर बुधवारपासून सभा होईपर्यंत औरंगाबाद येथेच मुक्कामी थांबणार आहेत.
औरंगाबाद महापालिकेपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावामागे लावलेली ‘हिंदू जननायक’ ही बिरुदावली आता अधिक आक्रमकपणे पुढे आणली जात आहे. निमंत्रण पत्रिकेवर प्रभू श्रीरामाऐवजी आता स्वराज्याची राममुद्रा तसेच भगव्या ध्वजावर लक्ष्मणाला शक्ती लावल्यानंतर डोंगरासह संजीवनी आणणाऱ्या हनुमानाचे चित्र साकारण्यात आले आहे. शहरातील ६५ हिंदूबहुल भागात निमंत्रणे दिली जात आहेत. दरम्यान या सभेनंतर महापालिका निवडणुकांवर कोणते परिणाम होऊ शकतील याची चाचपणी आता सुरू झाली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारीवरून नाराजी वाढेल. ते नाराज मनसेमध्ये जातील. तसेच भाजपमधील नाराजांनाही मनसेमध्ये पाठविले जाऊ शकते. त्यामुळे सेनेचे मत घटविण्यासाठी मनसेच्या सभेचा अधिक उपयोग होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे किती टोकदार हिंदूत्व मांडतील, त्याचे परिणाम काय होतील, याची उत्सुकता भाजप समर्थकांमध्ये आहे. दरम्यान आता भोंगेही खरेदी केले जात आहेत. एका बाजूला हे सारे सुरू असताना मशिदींवरील एमआयएमकडून राज ठाकरे यांची सभा व मशिदीवरील भोंगे यावर प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही. तर दुसरीकडे अलीकडेच राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ‘ सर्व पक्षांना विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असून पोलिसांनी मनसेला परवानगी द्यावी असे म्हटले आहे.’ उमेदवारी न मिळालेले शिवसेनेतील नेते मनसेकडे जाणारच नाहीत. मनसेमुळे फारसा परिणाम होणार नाही, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. संघटनात्मक पातळीवर मनसेची ताकद कमी असल्याने केवळ भाषणांमुळे फारसे परिणाम होणार नाहीत असे शिवसेनेतील नेत्यांना वाटते. हिंदू म्हणून होणाऱ्या ध्रुवीकरणामध्ये टीकेचे लक्ष्य राष्ट्रवादी असेल याची जाणीव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना असल्यानेच त्यांनी शिक्षक संघटनेच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे नाव घेता त्यांना टोला लगावला. काँग्रेसकडूनही राज ठाकरे यांच्या भोंगे हटविण्याच्या भूमिकेवर स्थानिक पातळीवर जाहीर भूमिका व्यक्त झालेली नाही. मात्र, आता मनसेच्या सभेची इतर पक्षांतच अधिक उत्सुकता असल्याचे चित्र दिसून येत आहे.
0 टिप्पण्या