श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर


राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर हिसंक निदर्शने, नागरिकांकडून वाहनांची जाळपोळ

आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती बिकट बनली आहे. देश सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या संकटातून जात आहे. श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर रांगा लावाव्या लागत आहेत. या रांगेत वृद्धांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर पेट्रोल पंपावर सैन्यदल तैनात करण्यात आले होते. त्यातच आता श्रीलंकेत विजेची देखील टंचाई निर्माण झाली आहे. लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. पेपरच्या तुटवड्याभावी येथील परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. नागरिकांकडून सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे  यांच्या निवासस्थानाबाहेर देखील नागरिकांकडून हिंसक आंदोलन करण्यात आले.


श्रीलंकेत आणीबाणी

दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा देशात आणीबाणी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना राजपक्षे यांनी म्हटले की, सध्या आपण एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहोत. मात्र त्याचवेळी देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणीबाणी सारखा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक निदर्शने करण्यात आली होती. त्याबाबत बोलताना राष्ट्राध्यक्षांनी म्हटले की, ही दहशतवादी कृत्य असून, यामागे विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ

श्रीलंकेत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असून, प्रचंड प्रमाणात सरकारी संपत्तीचे नुकसान सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर नागरिकांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर देखील काल तीव्र निदर्शने केली. या आंदोलनाला हिंसक वळन लागले. देशात काही ठिकाणी दगडफेकीच्या देखील घटना घडल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अखेर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आणीबाणी लागू करण्यात आल्याने गोटाबाया यांच्या अधिकारांमध्ये वाढ झाली असून, देशाच्या कोणत्याही भागातील संपत्ती जप्त करण्याचा तसेच हिंसक परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना प्राप्त झाले आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या