सलग सहा सामने गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सचे ‘आयपीएल’ क्रिकेटच्या यंदाच्या हंगामातील आपले आव्हान टिकवण्याचे ध्येय असून गुरुवारी त्यांचा चेन्नई सुपर किंग्जशी सामना होईल.
कर्णधार रोहितवर दडपण
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने यंदा निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला सहा सामन्यांमध्ये केवळ ११४ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर फलंदाज, तसेच कर्णधार म्हणूनही दडपण आहे. त्याचा सलामीचा साथीदार इशान किशनच्या (सहा सामन्यांत १९१ धावा) कामगिरीतही सुधारणेला वाव आहे. मधल्या फळीत अनुभवी सूर्यकुमार यादवला डेवाल्ड ब्रेव्हिस आणि तिलक वर्मा या युवकांची चांगली साथ लाभते आहे. परंतु अनुभवी किरॉन पोलार्ड (सहा सामन्यांत ८२ धावा) विजयवीराची भूमिका बजावण्यात अपयशी ठरतो आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा वगळता सर्वानीच निराशा केली आहे. या सामन्यात टायमल मिल्सच्या जागी रायली मेरेडिचला संधी मिळू शकेल.
ऋतुराज, उथप्पा, दुबेवर भिस्त
चेन्नईला गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पराभूत केले. मात्र, या सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (४८ चेंडूंत ७३ धावा) यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. तो आता कामगिरीत सातत्य राखेल अशी चेन्नईला आशा आहे. तसेच शिवम दुबे (सहा सामन्यांत २२६ धावा) आणि रॉबिन उथप्पा (सहा सामन्यांत १९७ धावा) यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी अष्टपैलू योगदान देणे गरजेचे आहे. .
0 टिप्पण्या