पुण्यात सीएनजीच्या दरवाढीचा भडका; एका महिन्यात चौथ्यांदा वाढले दर


पुणे : महागाई काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या स्थिर असतानाच सीएनजीच्या किंमती वाढताना दिसत आहेत. पुणे शहरात आजपासून सीएनजीच्या दरात किलोमागे २.२० रुपयांनी वाढ झाली आहे. अखिल भारतीय पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अली दारूवाला यांनी सांगितले की, पुणे शहरात २९ एप्रिलपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) चे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आता शहरात सीएनजी २.२० पैशांनी वाढून ७७.२० रुपये प्रति किलो होणार आहे. यापूर्वी शहरात सीएनजीचा दर ७५ रुपये किलो होता. नैसर्गिक दरात वाढ केल्यानंतर आता सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरात महिनाभरात चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.

पुणे शहरातील सीएनजीच्या दरात महिनाभरात चार वेळा वाढ करण्यात आली असून आतापर्यंत एकूण १५ रुपये किलो दरवाढ झाली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला येथे सीएनजीची किंमत ६२.२० रुपये प्रति किलो होती. आधी ६ एप्रिलला त्यात ७ रुपयांनी वाढ झाल्याने ही किंमत ६८ रुपये, नंतर १३ एप्रिलला ५ रुपयांनी वाढ होऊन ७३ रुपये झाली होती. यानंतर १८ एप्रिलला त्यात २ रुपयांनी वाढ होऊन भाव ७५ रुपये किलोवर पोहोचले. आता आजच्या वाढीनंतर सीएनजी एकूण १५ रुपयांनी महागला आहे.

१ एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील व्हॅटमध्ये मोठी कपात केली होती. हे दर १३ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणले. यामुळे किंमतींमध्येही मोठी घसरण झाली. मात्र, त्याच दिवशी केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमती १०० टक्क्यांहून अधिक वाढवल्या होत्या, त्यानंतर सीएनजी आणि पीएनजीची इनपुट कॉस्टही वाढली होती आणि कंपन्यांनी त्यांच्या किरकोळ किमतीही वाढवल्या होत्या.

अली दारूवाला म्हणतात की, भारत गेल्या अनेक वर्षांपासून कतार, मस्कत आणि अरब देशांकडून गॅस खरेदी करत आहे. आतापर्यंत २० डॉलर प्रति सिलेंडर दराने गॅस मिळत होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर उद्भवलेल्या संकटामुळे, युरोपियन देशांमध्ये गॅसची किंमत ४० डॉलरपर्यंत वाढली आहे. आता भारतातही त्याच किमतीत गॅस मिळत आहे. अशा स्थितीत कंपन्यांवरील खर्चाचा बोजाही दुपटीने वाढला आहे. जर लवकरच दर कमी झाले नाहीत तर देशात सीएनजीची किंमत ८० रुपयांपर्यंत जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या