येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातून सेवानिवृत्त होऊनही निवासस्थाने न सोडलेल्या ६६ कर्मचाऱ्यांना महालेखापालांनी जोरदार दणका दिला आहे. निवासस्थानात ठाण मांडून बसलेल्या आणि वीज, पाण्याचा वापर करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधून दंडासह शुल्क वसुली करण्याचे आदेश पुणे कोषागाराला देण्यात आले आहेत.
रुग्णालयाच्या सेवानिवृत्त ६६ कर्मचाऱ्यांकडून तब्बल १२ कोटी रुपयांची वसुली होणार आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वसुलीच्या भितीने अनेकांनी निवासस्थाने सोडण्यावर भर दिला आहे.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्या सेवकांसाठी रुग्णालयाच्या शेजारी मोठी कर्मचारी वसाहत आहे. निवासस्थानाच्या बदल्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ठरावीक रक्कम कापून घेतली जाते. सरकारी नियमानुसार सेवेतून निवृत्त झाल्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्याने निवासस्थान सोडणे अपेक्षित असते. पण रुग्णालयातील अनेक कर्मचारी सेवेतून निवृत्त होऊनही वर्षानुवर्षे निवासस्थाने सोडत नाहीत. त्यामुळे सेवेत कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गंभीर झाला होता. याशिवाय मोफत वीज आणि पाण्याचा वापर वाढला असून, रुग्णालयाच्या निधीवर याचा ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने निवृत्त होऊनही निवासस्थाने न सोडलेल्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, या कर्मचाऱ्यांकडून नोटिशींना दाद मिळत नसल्याने प्रशासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून निवृत्त कर्मचाऱ्यांची निवासस्थानांतून हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्याबदल्यात प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात शुल्कदेखील भरले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी वर्षानुवर्षे निवासस्थाने सोडत नसल्याने सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे मनोरुग्णालय प्रशासनाने थेट महालेखापालांना पत्रव्यवहार करून दंडासह शुल्कवसुली करण्याची विनंती केली होती. महालेखापालांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निवासस्थाने न सोडलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन दंडासह शुल्क त्यांच्या पेन्शनमधून कापून घेण्याचे आदेश कोषागाराला दिले आहेत. त्यानुसार कोषागाराकडून कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधून रक्कम कापून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
रुग्णालयाच्या सेवेतून निवृत्त होऊनही ६६ सेवकांनी अजूनही निवासस्थाने सोडली नाहीत. वेळोवेळी नोटीस देऊनही दाद दिली नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे निवासस्थानात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांकडून निवासस्थानाच्या प्रत्येक चौरस फुटामागे दीडशे पट दंड वसूल करण्याची विनंती महालेखापालांकडे केली होती. महालेखापालांनी कागदपत्रांची पडताळणी करून ६६ कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधून दंड वसूल करण्याचे आदेश कोषागाराला दिले आहेत. प्राथमिक टप्प्यात १९ कर्मचाऱ्यांच्या वसुलीचे पत्र प्राप्त झाले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांचे आदेश लवकरच येतील.
- संजय राठोड, प्रशासकीय अधिकारी, मनोरुग्णालय
धास्तीने अनेकांनी सोडली निवासस्थाने
मनोरुग्णालयातून निवृत्त झालेल्या ६६ सेवकांपैकी अनेकांकडे प्रत्येकी दहा ते वीस लाख रुपयांची वसुली निघाली आहे. एकूण कर्मचाऱ्यांची दंडाची रक्कम पाहिल्यास हा आकडा बारा कोटी रुपयांपर्यंत जात आहे. या सर्व रकमेची वसुली संबंधित कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधून होणार आहे. याची माहिती मिळताच वसुलीच्या धास्तीने अनेकांनी निवासस्थाने सोडली आहेत.
0 टिप्पण्या