शास्त्रीय संगीतामध्ये समाधी अवस्थेची ताकद ; पं. सुरेश तळवलकर यांचे मत

 पुणे : शास्त्रीय संगीत केवळ बुद्धी, शरीर आणि मनापर्यंत नाही, तर आत्म्यापर्यंत जाऊन भिडते. आपल्यातील ‘मी’पणा संगीतामुळे गळून पडतो. संगीत सेवा रुजू करताना अनेकदा समाधी अवस्थेत तल्लीन झाल्याची अनुभूती येते. हीच आपल्या शास्त्रीय संगीताची खरी ताकद आहे, असे मत तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले. बिहारमधील मोतीहारी येथील पं. छोटेलाल मिश्र संगीत कला महाविद्यालयातर्फे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते पं. सुरेश तळवलकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कला महाविद्यालयाचे संचालक शैलेंद्र कुमार सिन्हा आणि निशिकांत कुमार सिन्हा या वेळी उपस्थित होते.

पं. तळवलकर म्हणाले, की संगीतामध्ये सातत्याने प्रयोग होतात. आपण देत असलेल्या योगदानाची पुरस्काराच्या रूपाने दखल घेतल्याने मनामध्ये कृतज्ञतेची भावना जागृत होते. या निमित्ताने आयोजित संगीत महोत्सवात ओमप्रकाश यांच्या भजन संध्येने रंग भरले. त्यांना डॉ. रजनीश तिवारी यांनी तबल्याची साथसंगत केली. उत्तरार्धात पं. सुरेश तळवलकर यांचे तबलावादन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या