मद्यप्राशन करून डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या आरोपीला सहा महिन्यांच्या सक्त मजुरीची शिक्षा

 



अलिबाग जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. महेश मधुकर पाटील असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटना ८ जून २०२१ रोजी जिल्हा रुग्णालयात घडली होती.



आरोपी महेश मुधकर पाटील यांनी मद्यप्राशन करून, रुग्णालयातील करोना विलगीकरण कक्षात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर विक्रमजित पाडोळे व त्यांच्या साथीदारांना धक्काबुक्की, शिवीगाळी आणि मारहाण केली होती. जिल्हाधिकारी रायगड यांनी लागू आपत्ती व्यवस्थापन कायद्या आंतर्गत केलेल्या करोना विषयक आदेशांचे उल्लघन करत करोना विलगीकरण कक्षात बेकायदेशीर प्रवेश केला होता.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भा.द.वी. कलम ३५३,५०४,२६९, २७०,१८८ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीसांनी तपास करून अलिबाग सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश १ तसेच अतिरीक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्या न्यायालयात झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून अँड. प्रमोद हजारे यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी डॉ. विक्रमजीत पाडोळे, साक्षीदार डॉ. साहील मकानदार, तपासिक अंमलदार एस एस शेंबडे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.



न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर शासकीय अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला, आणि आरोपीला भादवी कलम ३५३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ८५ अन्वये आरोपीला दोषी ठरविले. दोन्ही कलमांअंतर्गत सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या