“आता तू यांचा सांभाळ कर…”
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी आहे. तो सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. रितेश नेहमी त्याची पत्नी जिनिलिया, रियान आणि राहिलसोबत अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच रितेशने त्याची दोन मुलं रियान आणि राहिल हा क्रिकेटचा सामना बघताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या दोन्ही मुलांसह आयपीएलचा सामना बघताना दिसत आहे. यात त्याचा मुलगा राहिल हा गुजरात टायटन्सच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहे. तर दुसरा मुलगा रियान हा कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव झाल्याने फार दु:खी झाल्याचे दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओला कॅप्शन देताना रितेश म्हणाला की, “राहिल हा गुजरात टायटन्सच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव झाल्याने रियानला फार दु:ख झाले आहे. मी मात्र यात कोणाचीही बाजू घेऊ शकलो नाही. पण मी माझ्या आवडत्या खेळाडूंसोबत क्रिकेटचा आनंद लुटला.”
रितेशच्या या पोस्टवर ९ लाखांहून जास्त व्ह्यूज पाहायला मिळत आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रितेशची पत्नी जिनिलियानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘वेल डन बाबा…, आजचे कर्तव्य पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद’, अशी कमेंट जिनिलियाने केली आहे. त्यावर रितेशने ‘आता उरलेला महिना तू यांचा सांभाळ कर’, असे मजेशीररित्या म्हटले.
दरम्यान इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या १५ व्या हंगामातील ३५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये झाला. यात गुजरातने ८ धावांनी कोलकातावर विजय मिळवला. हा सामना मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला. गुजरातने नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकात ९ बाद १५६ धावा केल्या. मात्र, कोलकाताला २० षटकात ८ बाद १४८ धावाच करता आल्या.
0 टिप्पण्या